शिवभोजनचालकांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:22+5:302021-06-26T04:16:22+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील शिवभोजनचालकांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. जिल्ह्यात सध्या ३५ केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू असून त्यात ...

शिवभोजनचालकांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळेना
अहमदनगर : जिल्ह्यातील शिवभोजनचालकांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. जिल्ह्यात सध्या ३५ केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू असून त्यात दररोज ६ हजार १५० थाळ्यांचे वाटप होते. परंतु या केंद्रचालकांचे गेल्या तीन महिन्यांचे सुमारे दोन कोटी रुपये अनुदान थकले आहे.
शिवभोजन ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून यात प्रारंभी १० रुपयांना गरजू तसेच ज्यांची जेवणाची सोय नाही अशांना शिवथाळी देण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी पूर्णत: मोफत करण्यात आली. नगर जिल्ह्यात सध्या ३५ शिवथाळी केंद्र सुरू असून त्यापैकी १४ केंद्र नगर शहरात आहेत. प्रत्येक केंद्राला दीडशे, दोनशे थाळीवाटपाचे उद्दिष्ट असून दररोज एकूण ६ हजार १५० थाळ्या वाटप होतात.
या थाळ्यापोटी शहरातील केंद्रचालकाला प्रत्येक थाळीमागे ५०, तर ग्रामीण भागातील थाळीला ३५ रुपये अनुदान मिळते. दर १५ दिवसांनी हे अनुदान केंद्रचालकांना वाटप करण्याच्या शासनाच्या सूचना असून जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागातर्फे या योजनेचे नियोजन केले जाते. दर महिन्याला साधारण ७० ते ७५ लाख रुपये योजनेच्या अनुदानापोटी केंद्रचालकांना दिले जातात. परंतु १५ मार्चपासून म्हणजे तीन महिन्यांपासून हे अनुदानच वाटप झालेले नाही. या कालावधीचे सुमारे २ कोटी रुपये अनुदान रखडल्याने शिवथाळी केंद्रचालक अडचणीत आले आहेत. शासनाकडून जिल्हा स्तरावर हे अनुदान प्राप्त झालेेले आहे. मात्र जिल्हास्तरावरून ते वाटप झालेले नाही.
---------------
प्रशासनस्तरावरून माहिती मिळेना
शिवथाळी योजनेचे अनुदान का रखडले याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली घेतली असता कोणाकडूनही निश्चित माहिती मिळाली नाही. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क केला असता, ते एका बैठकीत व्यस्त होते. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना दूरध्वनीवरून संपर्क केला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्याकडे विचारणा केली असता, माहिती घेऊन कळवतो, असे त्यांनी सांगितले.
----------
फोटो - २५ शिवथाळी