श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:32 IST2018-12-28T11:57:16+5:302018-12-28T16:32:49+5:30
महापौर पदाच्या निवडणुकीत शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने शिवसेनेला मतदान केले.

श्रीपाद छिंदमचे शिवसेनेला मतदान; शिवसैनिकांनी सभागृहातच चोपले
अहमदनगर : शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले. सेनेने त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण केली असून त्याचे मतदान नाकारले आहे. ही भाजप व राष्ट्रवादीची खेळी आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. आम्ही छिंदमचे मत मागितले नव्हते. मात्र, भाजपाचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छिंदमशी हातमिळवणी करुन मुद्यामहून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याला सभागृहात उपस्थित ठेवून सेनेला मतदान करायला लावले, असा आरोप सेनेचे बाळासाहेब बोराटे व युवराज गाडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे सेनेने उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारले. छिंदमला आम्ही सभागृहातच चोपले असा दावा सेनेने केला आहे. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे २३ व छिंदमचे १ आणि सपाचे १ असे २५ मते मिळाली.
छिंदमला मारहाण करणा-या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत.