शिवसेनेचा जनाधार संपत चालला
By Admin | Updated: October 5, 2016 00:26 IST2016-10-05T00:15:59+5:302016-10-05T00:26:08+5:30
अहमदनगर : मी कधीही व्यक्तिगत पातळीवर टीका करत नाही. मात्र, शिवसेनेचा जनाधार संपत चालल्याने व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू आहे.

शिवसेनेचा जनाधार संपत चालला
अहमदनगर : मी कधीही व्यक्तिगत पातळीवर टीका करत नाही. मात्र, शिवसेनेचा जनाधार संपत चालल्याने व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात विखे ओसाड गावचे पाटील असा उल्लेख केला आहे. पण मला गाव तरी आहे. सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे गाव जाहीर करावे, असा पलटवार विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी नगरमध्ये केला.
‘सामना’ मध्ये सोमवारी प्रसिध्द झालेल्या अग्रलेखात विखे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका आहे. त्याला येथील पत्र परिषदेत उत्तर देताना विखे म्हणाले, शिवसेनेकडून सुरू असलेल्या व्यक्तिगत टिकेवरून त्यांच्या नेतृत्वाची पातळी दिसून येत आहे. त्यांनी मला गांडूळ संबोधले, पण गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेळ्या-बकऱ्या वाटणे म्हणजे शेती असा समज असणारे ठाकरे आता मुक्ताफळे उधळीत आहेत. मी ओसाड गावचा पाटील म्हणणाऱ्या ठाकरेंनी त्यांचे गाव जाहीर करावे, असे थेट आव्हान विखेंनी दिले.
स्वत:ला शेष नाग म्हणून घेणारी सेना सत्तेत आल्यापासून लाचारी पत्कारून बिळात लपून बसली आहे. सेना शेष नाग नसून कालीया आहेत. माझ्या नावात कृष्ण असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. दसरा मेळाव्याला शिवसैनिक पाठ फिरवतील, या भीतीपोटी माफिनामा व टीका नाट्य सुरू आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून बिळातील बांडगूळ असल्याची टीका विखे यांनी केली.
(प्रतिनिधी)लोकशाहीत मागण्यासाठी प्रत्येक समाजाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण करून मराठा समाज आरक्षण मागत नाही. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. वेळकाढूपणाची भूमिका घेऊ नये. छगन भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांच्या विषयी आदर असल्याचे विखे म्हणाले.