शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाने सेनेला टाकले अडचणीत
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:25:27+5:302014-09-28T23:27:59+5:30
अहमदनगर: शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचार फेरी, पक्षाच्या कार्यालयाजवळ, प्रचार सभांच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकविण्याचे नेहमीप्रमाणे नियोजन केले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाने सेनेला टाकले अडचणीत
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचार फेरी, पक्षाच्या कार्यालयाजवळ, प्रचार सभांच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकविण्याचे नेहमीप्रमाणे नियोजन केले आहे. मात्र या भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाची स्तुती करून शिवसेना-भाजपा युतीला निवडून देण्याचे केलेले आवाहन शिवसेनेला अडचणीचे ठरले आहे. यासाठी आता या भाषणांचे ‘एडिटिंग’ करण्याचा निर्णय शिवसेनेने स्थानिक पातळीवर घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आता प्रचाराच्या अनेक कल्पना लढवित आहेत. पक्षाची धोरणे, पक्षाचे चिन्ह, पक्षाची विचारप्रणाली, पक्षाचे दिवंगत आणि हयात नेते, त्यांची भाषणे यांचा प्रचारामध्ये खुबीने वापर करण्यात येत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांची आॅडिओ आणि व्हीडिओ कॅसेट नागरिकांना ऐकविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी खास रथ तयार करण्यात आले आहेत. या रथाच्या दोन्ही बाजूला व्हीडिओमधून बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण लोकांना दिसणार आहे. हा रथ रात्री फिरला तर ठाकरे यांचे भाषण बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. आजही ठाकरे यांच्या भाषणांच्या कॅसेट लावल्या तरी लोक त्या कान देऊन ऐकत आहेत. मात्र यावेळी राजकीय स्थिती बदलल्याने ठाकरे यांची भाषणे अडचणीची ठरली आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये शिवसेनेबरोबरच भाजपाचाही उल्लेख आलेला आहे. तसेच शिवसेना-भाजपाला निवडून देण्याचे आवाहन भाषणांमध्ये अनेकवेळा केलेले आहे. ही वाक्ये भाषणांमध्ये ठेवायची की नाही? या संभ्रमात शिवसेनेचे उमेदवार आहेत. काही स्थानिक कार्यकर्ते मात्र भाषणांचे ‘एडिटिंग’ करून त्यातील भाजपाचा, युतीचा उल्लेख काढून टाकण्याच्या विचारात आहेत.
शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे ठाकरे यांच्या भाषणाचा भाजपाला फायदा होणार नाही, यासाठी कार्यकर्ते भाजपाचा भाषणात उल्लेख नकोच, असा आग्रह करीत आहेत. ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्त्वाचे विचार ऐकण्यासाठी आजही नागरिक रस्त्यावर थांबून भाषण ऐकत आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांच्या सीडी ऐकल्याने भाजपाच्या गोटात मात्र उकळ्या फुटल्या होत्या. शिवसेनेच्या मदतीला बाळासाहेब ठाकरे यांची भाषणेही आता कालबाह्य झाल्याची टीका एका भाजपा नेत्याने दिली.
(प्रतिनिधी)