शिर्डी, राहत्यात उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:56+5:302021-03-21T04:20:56+5:30
अहमदनगर : शिर्डी व राहातामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे सर्वसामान्य कोविड रुग्णांचे ...

शिर्डी, राहत्यात उपाययोजना करा
अहमदनगर : शिर्डी व राहातामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे सर्वसामान्य कोविड रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. शिर्डी येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सरकारी यंत्रणेने बंद केलेले कोविड सेंटर त्वरित सुरू करावे. तसेच साईबाबा संस्थानच्या दोनशे रूमचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याकडे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे विलिगीकरण होत नाही. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे शिर्डी येथे ३१ डिसेंबरला बंद झालेले सरकारी यंत्रणेचे कोविड सेंटर तातडीने सुरू करुन त्यासाठी लागणारे डॉक्टर,नर्सेस व इतर स्टाफही उपलब्ध करून द्यावे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांची जबाबदारी निश्चित करावी.
साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये एच.आर.सी.टी.स्कॅन करण्यासाठी २२०० रुपये आकारले जातात. संस्थानच्या हॉस्पिटलने ते दर किमान एक हजार रुपये करावे, अशी जनतेची मागणी आहे. राहाता तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत.
आरटीपीसाअर करण्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे तेथे लोकांची रांग लागते. प्रचंड वेळ लागत असल्याने रुग्ण निघून जातात व कोरोनाचा फैलाव आणखी वाढतो. अँटिजेन टेस्ट बंद आहेत. कार्यकारी व उपकार्यकारी अधिकारी हे दोन्ही अधिकारी चेन्नई व हैदराबाद येथे गेले असल्याचे समजले. या दोघांचाही शिर्डी संस्थानमध्ये तपास नसल्याने हा कारभार नेमका कोणाच्या भरवशावर चालू आहे, असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे. यावर झालेल्या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कारवाई लवकरच करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांनी दिले.
------------
फोटो- २० पिपाडा
राहाता येथील डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.