माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:19+5:302021-06-06T04:16:19+5:30
पंचत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत शिर्डी नगर पंचायतीने ...

माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल
पंचत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत शिर्डी नगर पंचायतीने नगर पंचायत गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. आज, शनिवारी दुपारी या स्पर्धांचा ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत चार गटांत ६८६ ग्रामीण व नागरी संस्थांनी सहभाग घेतला. नगर पंचायत गटात १३० नगर पंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यात शिर्डी नगर पंचायतीने १११३ गुण मिळवून सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार पटकावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ऑनलाइन पद्धतीने हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. या अभियानात नगर पंचायतीने वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर, ई-चार्जिंग पॉइंट स्थापन करणे, स्वच्छ हवा व विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळे आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे शहराला प्रथम क्रमांक मिळाल्याचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले.
नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डीचे नागरिक, नगर पंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी यश मिळाले आहे.
..............
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईनगरीने वसुंधरा अभियानात मिळवलेला पुरस्कार अभिमानास्पद आहे. शहरातील नागरिक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी, कर्मचारी, सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत.
- राधाकृष्ण विखे, आमदार