शेवगाव- पाथर्डी पाणी योजनेला तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:21 IST2020-12-29T04:21:20+5:302020-12-29T04:21:20+5:30

शेवगाव : दोन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शेवगाव व पाथर्डी ...

Shevgaon- Waiting for technical approval for Pathardi water project | शेवगाव- पाथर्डी पाणी योजनेला तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा

शेवगाव- पाथर्डी पाणी योजनेला तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा

शेवगाव : दोन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शेवगाव व पाथर्डी नगर परिषदेसाठीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांना महायुती सरकारच्या काळात तत्त्वतः मान्यता मिळाली. मात्र, सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तांत्रिक मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने मान्यता कधी मिळणार, याकडे शेवगाव, पाथर्डीकरांच्या नजरा लागल्या आहेत.

आ. मोनिका राजळे यांनी याप्रश्नी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र, नगर विकासमंत्र्यांच्या दालनात मंजुरीअभावी ही योजना अडकली आहे. सध्याची शेवगाव- पाथर्डी व ५४ गावे अशी पाणीपुरवठा योजना १ एप्रिल १९९९ साली, १ लाख ३५ हजार लोकसंख्या गृहीत धरून कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या योजनेचे आयुर्मान २००५ साली संपले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प, जलवाहिनी यांचे आयुष्यमान संपलेले असतानाही वाढलेल्या लोकसंख्येसह दोन लाख लोकांची तहान ही योजना भागवते आहे.

या योजनेचे आयुर्मान संपल्याने नगरविकास विभाग अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून शेवगाव नगर परिषदेसाठी ६९ कोटी, तर पाथर्डी नगर परिषदेसाठी ६३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. आगामी ३० वर्षांचा विचार करून २०५० साला पर्यंत दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा या योजनेत प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या योजनेसाठीचा नगर परिषदेचा हिस्सा निधीही शासनाकडे भरण्यात आल्याची माहिती आहे. या दोन्ही योजनांना नगरविकास विभागाची तत्त्वतः मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू होऊ शकते; परंतु तांत्रिक मान्यता कधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

----

धरण उशाला कोरड घशाला...

शेवगाव शहरालगत जायकवाडी धरणाचा फुगवटा आहे. अनेकांनी शेती, उद्योग, कारखाने यासाठी स्वतंत्र पाइपलाइन करून पाणी आणले आहे. मात्र, शहरवासीयांना धरण उशाला असूनही घशाला कोरड पडलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना वणवण करावी लागते.

Web Title: Shevgaon- Waiting for technical approval for Pathardi water project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.