शेट्टींना उसापेक्षा मंत्रिपदाची काळजी
By Admin | Updated: November 28, 2014 01:15 IST2014-11-28T00:48:59+5:302014-11-28T01:15:44+5:30
कोपरगाव : ऊस दराबाबत इशारे देऊन आंदोलन पुढे पुढे ढकलण्याचे काम सध्या खा़ राजू शेट्टी करीत आहेत़ मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे त्यांचा डोळा आहे़

शेट्टींना उसापेक्षा मंत्रिपदाची काळजी
कोपरगाव : ऊस दराबाबत इशारे देऊन आंदोलन पुढे पुढे ढकलण्याचे काम सध्या खा़ राजू शेट्टी करीत आहेत़ मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे त्यांचा डोळा आहे़ उसापेक्षा त्यांना मंत्रिपदाची काळजी असल्याने त्यांचे सध्या सरकारशी ब्लॅकमेलींग सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कोपरगावात केला़
ऊस दर हक्क संघर्ष यात्रेनिमित्त कोपरगावात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ गुरूवारी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना, संजीवनी कारखाना व गणेश कारखान्यावर ही संघर्ष यात्रा गेली़ पुढे बोलताना रघुनाथदादा म्हणाले, राजू शेट्टी हे कारखानदारांनीच उभे केलेले भूत आहे़ एकाच भागात आंदोलनाची नौटंकी ते करतात़ त्यांची आंदोलने शेतकऱ्यांसाठी किंवा ऊस दरासाठी नसतात़ ते पूर्णपणे राजकारणी झाले आहेत़ सरकारला धमक्या देऊन ते स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत़ एफआरपीच २६०० रूपये आहे तर ते त्यापेक्षा कमी म्हणजे २२०० रूपये भाव घेतात़ तडजोडीचे राजकारण आता उघडे पडत आहे़ लबाड्या अनेक दिवस चालत नाहीत, असा टोला पाटील यांनी मारला.
शेतकऱ्यांसाठी चळवळ आम्ही उभी केल्याचे सांगून रघुनाथदादा म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतो, शेट्टी मात्र आंदोलने करून गोळीबार घडवितात़ त्यात यांना काहीच होत नाही, मरतो शेतकरी, असा आरोपही रघुनाथदादांनी केला.
यावेळी पाटील यांच्या समवेत क्रांतीसिंह नानापाटील ब्रिगेडचे शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपटे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे, संपर्क प्रमुख शिवाजीराव जवरे, संजय गाडे, संजय जगताप, निलेश चांदगुडे, सचिन चौघुले, रूपेंद्र काले होते़ (प्रतिनिधी)
उसाला प्रतीटन ३५०० रूपये दर मिळाला पाहिजे, ऊस तोडणी मजुरांना समान काम समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकी ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे, तसेच सी़ रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य केल्या पाहिजे, अशी भूमिका रघुनाथदादा पाटील यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना, संजीवनी कारखाना व्यवस्थापनासमोर मांडली़ कारखानदारांनीही त्यांच्या मागणीला समर्थन असल्याचे जाहीर केले़