शेळके याच्या जामीन अर्जावर आज निर्णय
By Admin | Updated: November 6, 2014 14:44 IST2014-11-06T14:44:00+5:302014-11-06T14:44:00+5:30
मार्केटयार्ड भागातील डॉ. सुजाता शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे पती डॉ. निलेश शेळके याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.६)सुनावणी होणार आहे.

शेळके याच्या जामीन अर्जावर आज निर्णय
आत्महत्या प्रकरण : सरकारी पक्षाचा युक्तिवाद होणार
अहमदनगर : मार्केटयार्ड भागातील डॉ. सुजाता शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे पती डॉ. निलेश शेळके याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.६)सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या कामकाजामध्ये डॉ. शेळके यांच्या वकिलांनी बाजू मांडली, तर गुरुवारी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडण्यात येणार आहे.
मार्केटयार्ड भागातील डॉ. सुजाता शेळके यांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री विश्वास नर्सिंग होम या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी डॉ. सुजाता यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ. निलेश याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात डॉ. निलेश याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सध्या जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी डॉ. शेळके यांच्यावतीने अँड. अनंत फडणीस, अँड. पंकज खराडे, अँड. अभिषेक भगत यांनी बाजू मांडली. डॉ. शेळके यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. शासनाकडे त्यांनी प्राप्तीकर आगाऊ भरलेला आहे. त्यामुळे १५ लाख रुपयांसाठी पत्नीचा ते छळ करू शकत नाहीत. दोन्ही मुलींचे ते वडील असल्याने तो अपहरणाचा गुन्हा ठरू शकत नाही, आदी मुद्दय़ांवर सखोलपणे ४५ मिनिटे युक्तिवाद झाला. गुरुवारी सरकारी पक्षाची बाजू मांडली जाणार आहे. दरम्यान डॉ. शेळके यांचे आई-वडील, एक नातेवाईक, एक चालक अशा चौघांचे यापूर्वीच अंतरिम जामीन अर्ज मंजूर झाले आहेत. डॉ. शेळके यांच्या जमीन अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत हे अंतरिम जामीन अर्ज मंजूर राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड.ए.एम. घोडके काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)