‘माऊली’त तिला मिळाले आयुष्याचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:11+5:302021-07-29T04:22:11+5:30
ती दूर कुठल्या गावखेड्यातली. माय लहानपणीच आजाराने ग्रासलेली. तिचे करता करता हिचे लहानपण नकळत संपले. आई त्याच जीवघेण्या आजारात ...

‘माऊली’त तिला मिळाले आयुष्याचे दान
ती दूर कुठल्या गावखेड्यातली. माय लहानपणीच आजाराने ग्रासलेली. तिचे करता करता हिचे लहानपण नकळत संपले. आई त्याच जीवघेण्या आजारात संपून गेली. नंतर बापही दारू पीत देवाघरी गेला. बालपण हरवलेच, पण मग वयही वाढत गेले. आई-बाप वारल्यावर भाऊ बायकोला घेऊन परागंदा झाला. हिच्या लग्नाचेही वय उलटत गेले. पुढे रोजाराजी काम करता करता आणि एकटेपणाचे दुःख पचवता पचवता ती जगू लागली. हळूहळू या सगळ्या मानसिक धक्यातून सावरताना तिच्या त्या उदास जगण्याचे शारीरिक आजारात कधी रूपांतर झाले तिला कळलेच नाही. कॅन्सर झाल्याने तिची छाती दगडासारखी झाली होती. बारामती परिसरातील आसपासच्या वाडीवस्तीवरील ग्रामस्थ तिला आधार देत होते. पुढे त्यांनीच तिला माऊली प्रतिष्ठानमध्ये आणले.
नंतर डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रशांत पठारे आणि संपूर्ण मॅककेअरच्या टीमने तिच्या मोफत उपचाराची जबाबदारी उचलली. तिचा कॅन्सर अगदी शेवटच्या टप्प्यात असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत सहा केमोथेरपी झाल्या आहेत. शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरमधून ती आश्यर्यकारकपणे सावरते आहे. एका अर्थाने तिला माऊली संस्थेत नवीन आयुष्याचे दान मिळाले आहे.
माऊलीचे संस्थापक डाॅ. राजेंद्र धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत सध्या ३६० माय-भगिनी व ३० लेकरांचे कुटुंब एकदिलाने नांदत आहे.
------------
फोटो - २८ माऊली