‘तिने’ भोगल्या जीवंतपणी मरणयातना
By Admin | Updated: July 19, 2024 13:07 IST2014-09-17T23:28:05+5:302024-07-19T13:07:33+5:30
पारनेर : खासगी डॉक्टरच्या चुकीच्या निष्कर्षामुळे एका गरोदर महिलेला जीवंतपणी मरतयातना भोगण्याची वेळ आली़

‘तिने’ भोगल्या जीवंतपणी मरणयातना
पारनेर : खासगी डॉक्टरच्या चुकीच्या निष्कर्षामुळे एका गरोदर महिलेला जीवंतपणी मरतयातना भोगण्याची वेळ आली़ नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर खासगी डॉक्टरकडे तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चक्क तुम्ही एचआयव्ही बाधित असल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला़ हा अहवाल पाहून महिलेसह नातेवाईकांच्या काळजाचे ठोके चुकले़ प्रसूतिकाळ जवळ आल्यानंतर या महिलेला कोणी रुग्णालयातही दाखल करून घेईना़ बाळंत झाल्यानंतरही नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचीही परवड सुरू झाली़ शेवटी एचआयव्ही नसल्याचा शासकीय रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़
तालुक्यातील एक गरोदर महिला अळकुटी मार्गावर असलेल्या खासगी रुग्णालयात नियमित उपचार घेत होती़ दोन दिवसांपूर्वी नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर प्रसूतिबाबत तपासणी करण्यासाठी सदर महिला त्या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली़ यावेळी डॉक्टरने सदर महिलेच्या रक्ताचे नमुने घेतले़ हे नमुने एका पॅथॉलॉजी लॅबकडे पाठविले़त्यांनी सदर महिलेला चक्क एचआयव्हीची लागण असल्याचा अहवाल दिला़ हा अहवाल पाहून डॉक्टरने त्या महिलेला बेल्हे रस्त्यावरील एका शासकीय रूग्णालयात पाठविले. मात्र, तिच्या जवळ असलेला एचआयव्ही बाधितचा अहवाल तिला मरणयातना देणारा ठरला़ हा अहवाल पाहून त्या रुग्णालयात महिलेला दाखल करून घेतले नाही़ नंतर या महिलेला पारनेर येथील एका रुग्णालयात नेण्यात आले़ तेथे या महिलेला दाखल करून घेण्यात आले़ प्रसूतिनंतर बाळाला एचआयव्हीची बाधा होऊ नये म्हणून एक इंजेक्शन द्यावे लागते़ महिलेच्या नातेवाईकांनी रात्रभर धावपळ करून औरंगाबाद येथून हे इंजेक्शन आणले़ या रुग्णालयात या महिलेने एका मुलीला जन्म दिला़ मात्र, एचआयव्हीचा अहवाल पाहून त्या बाळाला कोणी हातातही घेईना़ मात्र, पुर्नतपासणी अहवालात या महिलेला एचआयव्ही नसल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला़
(तालुका प्रतिनिधी)