शास्त्र शाखेत नगर अव्वलच !

By Admin | Updated: May 25, 2016 23:47 IST2016-05-25T23:43:20+5:302016-05-25T23:47:21+5:30

अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्हा (८७.१२ टक्के) तिसऱ्या स्थानावर घसरला

Shastra branch city is the top! | शास्त्र शाखेत नगर अव्वलच !

शास्त्र शाखेत नगर अव्वलच !

अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्हा (८७.१२ टक्के) तिसऱ्या स्थानावर घसरला असला तरी शास्त्र शाखेत मात्र नगर अव्वल ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात आघाडी घेतली असून जिल्ह्यात ९२.४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांचे तेच प्रमाण थेट ८३.३६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
बुधवारी बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर झाला. यंदा जिल्ह्यातून ३४ हजार ३२५ मुले, तर २४ हजार २१० मुली असे एकूण ५८ हजार ३३५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील २२ हजार ३८५ मुले (८३.३६ टक्के), तर २८ हजार ६६२ मुली (९२.४६ टक्के) असे एकूण ५० हजार ९९७ (८७.१२ टक्के)विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात पुणे, सोलापूर व नगर अशा तीन जिल्ह्यांत नगर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहे. यंदा सोलापूर जिल्हा विभागात (८७.२६) अव्वल असून, पुणे (८७.२३) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शास्त्र शाखेत पुणे विभागात नगरने वर्चस्व राखले आहे. या शाखेचा नगरचा निकाल ९४.७६ असून, सोलापूर (९४.६२) व पुणे (९२.७९) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे कला शाखेत सोलापूरने (७९.४८) आघाडी घेतली असून, यात नगर (७५.७१) व पुणे (७३.५७) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. वाणिज्य विभागातही सोलापूरच (९१.६८) पुढे असून, त्यापाठोपाठ नगर (९०.७८) व पुणे (८९.१०) आहे. (प्रतिनिधी)
तीन रिपीटरनेही मिळविले विशेष प्राविण्य!
रिपीटर विद्यार्थ्यांचा जिल्ह्याचा निकाल २६.८२ टक्के लागला. एकूण १८३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ४९१जण उत्तीर्ण झाले. यातील तिघांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर २५ जणांना प्रथम व ३८ जणांना द्वितीय श्रेणी मिळाली. या निकालातही नगर जिल्हा विभागात तिसऱ्याच स्थानी आहे.
२४७४ जणांना विशेष प्राविण्य
जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या एकूण ५० हजार ९९७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे, तर २० हजार २९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व २६ हजार ५८३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत. एकूण ८४ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.
१०० नंबरी कॉलेज
न्यू इंग्लिश स्कूल (श्रीरामपूर), सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज (मांडवगण, ता़ श्रीगोंदा), त्रिमूर्ती पब्लिक कॉलेज (शेवगाव), न्यू इंग्लिश स्कूल (खांबे, ता़संगमनेर), गायत्री विद्यालय (देवळाली प्रवरा, ता़ राहुरी), प्रवरा पब्लिक स्कूल, (प्रवरानगर, राहाता), इंग्लिश मेडिअम स्कूल (लोणी, राहाता), आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज (पाथर्डी), शिवतेज कॉलेज (मढी, ता़ पाथर्डी), मातोश्री भागुबाई कॉलेज (नगर), आॅक्झिलियम कॉन्हेंट स्कूल (नगर), एऩ डी़ कासार पाटील कॉलेज (वाळकी, ता़ नगर), भवानीनगर इंग्लिश मीडियम स्कूल (नगर), संजीवनी ज्युनिअर कॉलेज (कोपरगाव), संजीवनी सैनिकी स्कूल (सहजानंद नगर, कोपरगाव), संत गजानन विद्यालय (कर्जत), न्यू इंग्लिश स्कूल (कर्जत), फाळके ज्युनिअर कॉलेज (कर्जत), शासकीय आश्रमशाळा (पैठण, ता़ अकोले) या विद्यालयांचे निकाल शंभर टक्के लागले़
संगमनेरला मागे टाकून कर्जतची अव्वल स्थानी झेप
बारावीच्या निकालात गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला संगमनेर तालुका मात्र यंदा दुसऱ्या स्थानावर घसरलेला आहे़ कर्जत तालुक्यातील नियमित परीक्षेला बसलेले ९१़७८ टक्के उत्तीर्ण झाले असून, त्याखालोखाल संगमनेर आहे़
कर्जत तालुक्यातून २९८२ नियमित विद्यार्थी तर ६४ रिपीटर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ नियमित विद्यार्थ्यांपैकी ९१़७८ टक्के विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले आहेत़ मात्र, ६४ पुनर्परीक्षार्थींपैकी केवळ १४ जण पास झाले आहेत़ संगमनेर तालुक्यातील नियमित परीक्षार्थींची संख्या ६९२५ एवढी होती़ त्यापैकी ६३५१ विद्यार्थी पास झाले़ म्हणजे ९१़७१ टक्के निकाल लागला़ मात्र, रिपीटर १०३ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ रिपीटरच्या उत्तीर्णांचे प्रमाण संगमनेरमध्ये सर्वाधिक ३९़८१ टक्के आहे़
शंभर नंबरातून तीन कॉलेज बाद
संगमनेर येथील अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १६३ मुलांनी परीक्षा दिली़ त्यातील एक मुलगा नापास झाला़ त्यामुळे या विद्यालयाचा निकाल ९९़३९ टक्के लागला तर साकुर येथील विरभद्र विद्यालयातील २९९ मुलांनी परीक्षा दिली़ या विद्यालयातीलही एक मुलगा नापास झाला़ त्यामुळे हे दोन्ही कॉलेज १०० टक्के निकालातून बाद झाले आहेत़
शेवगावच्या रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेजमधील २२९ मुलांनी परीक्षा दिली़ या विद्यालयातील एक मुलगा अवघ्या काही गुणांनी नापास झाला आहे़ त्यामुळे या कॉलेजची टक्केवारी ९९़५६ वर अडकली आणि शंभर टक्क्यातून हे कॉलेज बाद झाले़
खुपटीच्या कॉलेजचा निकाल शून्य
नेवासा तालुक्यातून यंदा ३५२२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २५६ विद्यार्थी रिपीटर होते़ नियमितपैकी सर्वांत कमी २७५९ (७८़३४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ गेल्या वर्षीही नेवासा तालुक्यात सर्वात कमी निकाल लागला होता़ ही परंपरा यंदाही राहिली़ तर विशेष म्हणजे नेवासा तालुक्यातील खुपटी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल शून्य टक्के लागला आहे़ या विद्यालयातून अवघा एक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसला होता़ मात्र, तोही नापास झाला़ त्यामुळे शून्य टक्के निकाल लागणारे खुपटी येथील न्यू इंग्लिश स्कूल हे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय ठरले आहे़

Web Title: Shastra branch city is the top!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.