हार्वेस्टींगद्वारे ऊस तोडणी जोरात
By Admin | Updated: November 28, 2014 01:15 IST2014-11-28T00:44:34+5:302014-11-28T01:15:04+5:30
श्रीगोंदा : यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणी मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ मात्र ऊस पाचरटाची कुट्टी व जलद ऊस तोडणी होण्यासाठी हार्वेस्टींग मशीनद्वारे ऊस तोडणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे़

हार्वेस्टींगद्वारे ऊस तोडणी जोरात
श्रीगोंदा : यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणी मजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ मात्र ऊस पाचरटाची कुट्टी व जलद ऊस तोडणी होण्यासाठी हार्वेस्टींग मशीनद्वारे ऊस तोडणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे़
हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याने १५, श्रीगोंदा ६, कुकडी कारखान्याने २ हारवेस्टींग मशीनद्वारे ऊस तोडणीचा कार्यक्रम हाती घेतला. साईकृपा कारखाना आणखी ५ हार्वेस्टींग ऊस तोडणीसाठी आणणार आहे. त्यामुळे तालुक्यात २८ हार्वेस्टींग मशीनद्वारे दररोज सुमारे ८ हजार मेट्रीक टन उसाची तोडणी होणार आहे.
बहुतेक शेतकऱ्यांनी ५ फुटी व पट्टा पद्धतीने ऊस लागवड केल्याने हार्वेस्टींगद्वारे ऊस तोडणी अधिक सुलभ होत आहे. हार्वेस्टींग मशीनमुळे ऊस जमिनीला घासून तोडला जात आहे. शिवाय वाढ्याजवळील एक कांडी उसाचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मशीनद्वारे ऊस तोडणी करण्याचा शेतकऱ्यांचा कल पाहिला तर पुढील गाळप हंगामात हार्वेस्टींग मशीनची संख्या वाढणार हे निश्चित आहे. तालुक्यातील ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुर उपलब्ध आहेत़ मात्र, मशीनद्वारे ऊस तोडणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे़ त्यामुळे अनेका ऊस तोडणी मजुर बेरोजगार झाले आहेत़ हार्वेस्टर मशीनमुळे एकीकडे शेतकऱ्यांना फायदा होत आहे, तर दुसरीकडे मजुरांचे संसार उघड्यावर येत आहे़
(तालुका प्रतिनिधी)