शिवाजी कर्डिले, अंकुश काकडे यांचे चौथऱ्याखालून शनी दर्शन
By Admin | Updated: April 9, 2016 23:39 IST2016-04-09T23:34:46+5:302016-04-09T23:39:14+5:30
सोनई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगर-राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर यांनी शनिवारी सायंकाळी चौथऱ्याखालून दर्शन घेतले.

शिवाजी कर्डिले, अंकुश काकडे यांचे चौथऱ्याखालून शनी दर्शन
सोनई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगर-राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर यांनी शनिवारी सायंकाळी चौथऱ्याखालून दर्शन घेतले. कर्डिले यांनी शनिदेवाला अभिषेक केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची उशिरा अंमलबजावणी झाल्याविषयी पत्रकारांनी कर्डिले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी देवस्थानच्या भूमिकेचे समर्थन केले.
कर्डिले म्हणाले, न्यायालय आदेशाच्या अधीन राहून राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर झाल्याचे मला वाटत नाही. कारण स्थानिक भाविकांची मानसिकता तयार होण्यास वेळ लागेल. शेवटी हा कायदा आणि श्रद्धेचा भाग आहे. कायद्याचा सन्मान राखत देवस्थानने चौथऱ्यावरुन दर्शन खुले केले असले तरी कोणी चौथऱ्यावर जाण्याची सक्ती करू शकत नाही. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. यासाठी देवस्थानच्या विश्वस्तांनी भाविकांच्या सोयीसाठी दोन गेट करावेत. ज्यांना चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्यायचे ते चौथऱ्यावर जातील आणि ज्यांना चौथऱ्यावर जायचे नाही ते दुसऱ्या गेटने बाहेर जातील. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, महिला विश्वस्त शालिनी लांडे, किसन लोटके, विश्वस्त बापूसाहेब शेटे, आदिनाथ शेटे, राजू लांडे, चंद्रहास शेटे, माजी विश्वस्त दादासाहेब दरंदले उपस्थित होते. शनिवारी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाहेरील व परराज्यातील भाविकांनी देवस्थानच्या निर्णयाचे स्वागत करत चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. स्थानिक नागरिकांची नाराजी मात्र कायम आहे.