सात वर्षांत बदलले सतरा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:42+5:302021-01-04T04:18:42+5:30

अहमदनगर : महापालिका आयुक्तांचा कार्यकाळ जास्तीत-जास्त तीन वर्षांचा असतो. मात्र, अहमदनगर महापालिका त्यास अपवाद ठरली आहे. गेल्या सात वर्षांत ...

Seventeen commissioners changed in seven years | सात वर्षांत बदलले सतरा आयुक्त

सात वर्षांत बदलले सतरा आयुक्त

अहमदनगर : महापालिका आयुक्तांचा कार्यकाळ जास्तीत-जास्त तीन वर्षांचा असतो. मात्र, अहमदनगर महापालिका त्यास अपवाद ठरली आहे. गेल्या सात वर्षांत सतरा आयुक्त नगरमहापालिकेत येऊन गेले. एकमेव विजय कुलकर्णी यांनीच तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अलीकडच्या दोन वर्षांत श्रीकृष्ण भालसिंग व श्रीकांत मायकलवार हे दोघे आयुक्त इथेच सेवानिवृत्त झाल्याने नगर महापालिका सेवानिवृत्तांचे ठिकाण बनते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

सन २००३ मध्ये अहमदनगर महानगरपालिकेची स्थापना झाली. पहिले एक वर्ष मनपाला राजगोपाल देवरा व बी. डी. सानप यांच्या रूपाने आयएस दर्जाचे आयुक्त मिळाले. त्यात देवरा हे जिल्हाधिकारी होते. त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी जून ते सप्टेंबर २००३ असे तीन महिने काम पाहिले. त्याच्यानंतर प्रथमच सानप हे आयुक्त म्हणून रुजू झाले. एका महिन्यात सानप यांना आयएस मिळाले. परंतु, दहा महिन्यांतच त्यांची बदली झाली. त्यांच्यानंतर आजतागायत मनपाला पूर्णवेळ आयएस आयुक्त लाभले नाहीत. सानप यांची बदली झाल्याने उपायुक्त मनोहर हिरे व सुधाकर देशमुख यांच्याकडे प्रत्येकी एक महिना आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. सप्टेंबर २००४ मध्ये दत्तात्रय मेतके हे आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यांनी सप्टेंबर २००४ ते नोव्हेंबर २००६ या काळात काम पाहिले. मेतके यांच्यानंतर रमेश पवार हे आयुक्त म्हणून महापालिकेत रुजू झाले. त्यांची जून २००८ मध्ये बदली झाली. त्यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. कल्याण केळकर हे नोव्हेंबरमध्ये २००८ मध्ये आयुक्त म्हणून रुज झाले. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला होता. त्यांचा अर्ज डिसेंबर २००९ मध्ये मंजूर झाला. त्यामुळे आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त अच्युत हंगे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी २० दिवस आयुक्त म्हणून काम पाहिले. जानेवारी २०१० मध्ये संजय काकडे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. काकडे यांनी दिल्लीगेट येथील गाळे भुईसपाट केले. तसेच तारकपूर रस्त्यावरील अतिक्रमणाची कारवाईही त्यांच्याच कार्यकाळात झाली. आयुक्त काकडे यांची जून २०१२ मध्ये बदली झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजय कुलकर्णी हे रुजू झाले. त्यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आयुक्तपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे कुलकर्णी हे एकमेव आयुक्त आहेत. कुलकर्णी यांची जुलै २०१५ मध्ये बदली झाली. कुलकर्णी यांच्यानंतर विलास ढगे, दिलीप गावडे, घनशाम मंगळे यांनी प्रत्येकी एक वर्ष आयुक्त म्हणून काम पाहिले. मंगळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार मे २०१८ मध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला. त्यांनी नऊ महिने आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर श्रीकृष्ण भालसिंग यांच्या रूपाने पूर्णवेळ आयुक्त मिळाले. ते नोव्हेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार द्विवेदी यांच्याकडे सोपविण्यात आला. मार्च २०२० मध्ये श्रीकांत मायकलवार हे आयुक्त म्हणून रुजू झाले. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. अहमदनगर महापालिकेत सेवानिवृत्त झालेले मायकलवार हे दुसरे आयुक्त आहेत.

..

जिल्हाधिकारी द्विवेदी १३ महिने आयुक्त

महापालिकेचे आयुक्तपद कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला जातो. पुढील आदेश येईपर्यंत हा पदभार असतो. महापालिकेचे आयुक्तपद १३ महिने रिक्त राहिले. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे होता. सर्वाधिक काळ आयुक्त पदाचा पदभार असलेले द्विवेदी हे एकमेव जिल्हाधिकारी आहेत.

..

Web Title: Seventeen commissioners changed in seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.