सात हजार उमेदवारांची हजेरी
By Admin | Updated: April 11, 2016 00:43 IST2016-04-11T00:28:32+5:302016-04-11T00:43:56+5:30
अहमदनगर : नगर जिल्हा केंद्रावर झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला सात हजार उमेदवारांनी हजेरी लावली़

सात हजार उमेदवारांची हजेरी
अहमदनगर : नगर जिल्हा केंद्रावर झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला सात हजार उमेदवारांनी हजेरी लावली़ शहरातील २६ केंद्रांवर उमेदवारांची सकाळी व दुपारी, अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली़ ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत़
लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभर ही पूर्व परीक्षा घेण्यात आली़ नगर शहरातील शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर नऊ हजार ३२४ उमेदवार परीक्षा देणार असल्याचे कळविण्यात आले होते़ त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली होती़ रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी परीक्षेला सुरुवात झाली़ प्रथम सत्रातील पेपरला ७ हजार १४२ उमेदवार हजर होते़ हा पेपर दुपारी एक वाजता संपला़ द्वितीय पेपरला ७ हजार १०१ उमेदवार उपस्थित होते़ दोन्ही सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडली़ दुसऱ्या पेपरला ४१ उमेदवारांनी दांडी मारली़
परीक्षा केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांत सकाळपासूनच कडोकोट बंदोबस्त होता़ परीक्षा केंद्रांवर ८२२ कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली होती़ परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी सहा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली़ परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येकी एका केंद्रप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांच्या मदतीला प्रत्येकी एका सहायकाची नियुक्ती करण्यात आली होती़ तसेच पर्यवेक्षक म्हणून ९४ कर्मचारी कार्यरत होते़ याशिवाय लेखनिक, शिपाई आणि चालकांचीही नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली होती़