सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: July 1, 2014 00:15 IST2014-06-30T23:25:47+5:302014-07-01T00:15:13+5:30
अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ
अहमदनगर : राज्याच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सिंचन क्षमतेत सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी ज्वारी, खरिपातील बाजरीच्या क्षेत्रात लक्षणीय घट आली आहे. सूक्ष्म सिंचनात सर्वाधिक वापर ठिबकचा होत आहे. ठिबक सिंचनावर ऊस, डाळिंब बागांचे प्रमाण वाढले असून दरवर्षी ठिबक सिंचनाचे क्षेत्र १२ ते १५ हेक्टरने वाढत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात १ हजार ५८५ गावे असून खरीप हंगामाची ५७९ तर रब्बी हंगामाची १ हजार ६ गावे आहेत. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १७.२ लाख हेक्टर असून लागवडीखाली क्षेत्र १३ लाख ५९ हजार आहे. खरीप हंगामासाठी ४ लाख १२ हजार तर उन्हाळी- रब्बी हंगामासाठी ७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे.
कमी कालावधीत जास्तीतजास्त उत्पन्न मिळवून देणारे आणि नगदी पीक म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन, कापूस, मका पिकांच्या क्षेत्रात अलीकडच्या पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला २० हजार हेक्टरच्या जवळपास कापसाचे क्षेत्र होते. त्यानंतर त्याची सरासरी ६० हजार हेक्टरपर्यंत पोहचली तर २०१३-१४ मध्ये दीड लाख हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र वाढत गेले. ३० हजार हेक्टरपर्यंत असणारे सोयाबीनचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरपर्यंत पोहचले असून चारा पीक असणाऱ्या मका पिकाचे क्षेत्र ५६ हजार हेक्टर झाले आहे.
जिल्ह्यात मुळा, भंडारदरा ही प्रमुख धरणे असून पुणे जिल्ह्यातील घोड, कुकडीचे पाणी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि जामखेडला मिळते. या शिवाय पाच ते सहा मध्यम प्रकल्प असून नाशिक आणि मराठवाड्यातून काही प्रमाणात शेतीला पाणी मिळते. पाच वर्षापूर्वी जिल्ह्याची सिंचन क्षमता २१ टक्के होती. आता त्यात वाढ झाली असून २८ टक्के सिंचन क्षमता झालेली आहे.
यात लिप्ट इरिगेशन, शेततळी आणि प्रत्यक्ष सिंचनाचे प्रकार आहे. जिल्ह्यात दहा हजारांच्या जवळपास शेततळी असून त्यातील चार हजार शेतळ्यांची नोंद झालेली आहे. यातून समारे ५ हजार ५० हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आहे. वांबोरी चारी, कालवे, तलाव, बंधारे यांच्या माध्यमातून विहिरींच्या पाणी क्षमतेत वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण ठिबकचे असून १ लाख हेक्टर क्षेत्र ठिबकच्या माध्यमातून भिजवले जात आहे. दर वर्षी या क्षेत्रात १२ ते १५ हजार हेक्टरने वाढ होत आहे. विशेष करून उसासाठी ठिबकचे प्रमाण वाढले असून त्यातून मोठी पाणी बचत होत आहे. कापसासाठी ठिबक वापरण्याचा कल वाढला आहे.
शेततळी आणि डाळिंब असे समीकरण झाले असून राहुरी, शेवगाव, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा, राहाता या तालुक्यात शेततळी, ठिबक आणि डाळिंबाच्या बागांचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून त्यात १७ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. (प्रतिनिधी)
गत वर्षी जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या पावसाच्या कालखंडात ४९५ मिमी सरासरीच्या तुलनेत ५१९ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या १३५ टक्के पाऊस झालेला आहे.
सर्वसाधारण माहिती
खरिपाची गावे ५४९
रब्बीची गावे १००६
पाटपाण्या खालील क्षेत्र ६५ हजार हेक्टर
बागायत क्षेत्र २ लाख ६० हेक्टर
जमिनीचे प्रकार
हलक्या प्रतीची जमीन २४ टक्के
मध्यम प्रकारची जमीन ३८ टक्के
भारी काळी जमीन ३६ टक्के
तांबडी जमीन २ टक्के
पीकनिहाय क्षेत्र
ऊस १ लाख ६० हजार हेक्टर
भाजीपाला पीक ३० ते ४० हजार हेक्टर
चारा पिके ४० हजार हेक्टर
कांदा पीक ७६ हजार हेक्टर
फळबागा ६८ हजार हेक्टर
मका ५६ हजार हेक्टर
सोयाबीन ५६ हजार हेक्टर
कापूस १ लाख हेक्टरच्या पुढे