आरोग्य सेवा वगळता इतर सेवा पूर्णपणे बंद ठेवणार; मंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:54 IST2021-04-30T18:54:17+5:302021-04-30T18:54:24+5:30
आत्तापर्यंत लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करुन काहीही फलीत झाले नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत लोकं जत्रेसारखे फिरतात. त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णवेळ बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आरोग्य सेवा वगळता इतर सेवा पूर्णपणे बंद ठेवणार; मंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत
अहमदनगर : आत्तापर्यंत लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करुन काहीही फलीत झाले नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत लोकं जत्रेसारखे फिरतात. त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णवेळ बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे पुढील १४ दिवस कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे. तशा सुचना प्रशासनाला देणार आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मुश्रीफ हे शुक्रवारी नगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर नगरमध्ये ऑक्सिजन प्लँटला भेट दिली. तसेच जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतला.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळे दुसरी लाट घातक ठरत आहे. ही साखळी तोडण्यासाठी स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जुलै -ऑगस्टमध्ये येणारी कोरोनाची तिसरी लाट त्रासदायक ठरणार नाही, असे श्रीरामपूर येथे बोलताना मुश्रीफ यांनी यांनी सांगितले. यावेळी यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.
नगर, संगमनेर, श्रीरामपुरला ऑक्सिजन प्रकल्प
नगर, संगमनेर व श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. शिर्डी येथे लवकरच दोन हजार बेड्सचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यात दोनशे बेड्सना आयसीयु सुविधा असेल. एक हजार बेड्सला ऑक्सिजन सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारी गर्दी कमी होईल.