नगरमध्ये घरातील घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:54+5:302021-02-05T06:39:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, हा कचरा संकलन ...

नगरमध्ये घरातील घातक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने घरातील घातक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, हा कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीत स्वतंत्र पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बांधकाम साहित्याचा पुनर्वापर करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
अहमदनगर महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. मागील वर्षी स्वच्छतेत अहदमनगर शहराने देशात ४० वा क्रमांक पटकाविला. त्यामुळे महापालिकेला मानाचे ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले. चालूवर्षी महापालिकेने ‘५-स्टार’ मानांकनासाठी नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रत्येक प्रभागांतील निवासी, व्यावसायिक आणि मार्केट, असे विभाजन करण्यात आले आहे. शहरात ५० फुटांवर ‘व्टिवी-बीन’ ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी प्रभागांची पाहणी करण्यात आली नव्हती; परंतु, चालू वर्षी ‘५-स्टार’साठी नोंदणी केल्याने या सर्व बाबींची तपासणी पथकाकडून केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने प्रभाग समिती कार्यालयनिहाय कर्मचाऱ्यांची पथके तयार केेली आहेत. केंद्रीय पथक पाहणीसाठी अद्याप आलेले नाही. महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, हे पथक नगरमध्ये कोणत्याही क्षणी येऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.