शेळके आत्महत्या प्रकरणात वरिष्ठांचा दोष नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:45+5:302021-07-10T04:15:45+5:30
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश शेळके यांनी केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणातून असून, यामध्ये तालुका आरोग्य ...

शेळके आत्महत्या प्रकरणात वरिष्ठांचा दोष नाही
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश शेळके यांनी केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणातून असून, यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काहीच दोष नसल्याचे निवेदन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले.
आरोग्य विभागातील कर्मचारी संजय नरवडे, गणेश जंगम, संदीप अकोलकर, बयोबी पठाण, ललिता कासोळे, सुभाष कुलकर्णी, शिवाजी पालवे यांच्यासह विविध संवर्गातील कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजी (ता.पाथर्डी) आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्र इमारत येथे गळफास घेऊन आत्महत्या केली व चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचे नाव घेतले आहे, तसेच कामाचा अतिरिक्त ताण, पगार वेळेवर न होणे, पगार कपातीच्या धमक्या देणे असे लिहिले आहे. ही घटना अतिशय दुःखद आहे.
तालुका आरोग्य अधिकारी दराडे हे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन व घरगुती अडचणीत नेहमी पाठीशी उभे राहत. कोणत्याही अडचणीत ते अनेक कर्मचाऱ्यांना मदत करीत असत. मात्र, शेळके यांच्या चिठ्ठीत असलेले आरोप अनाकलनीय व चुकीचे आहेत. त्यांच्यावर जर अन्याय होत होता, तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे अवगत करणे होते. त्यावर आत्महत्या हा पर्याय नाही, अशी सर्व कर्मचाऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे शेळके यांच्या आत्महत्येस इतर जी काही कारणे व पार्श्वभूमी असेल, ती पोलिसांनी शोधावी. या सर्व प्रकरणामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.