आश्रमशाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

By Admin | Updated: June 22, 2014 00:22 IST2014-06-21T23:46:34+5:302014-06-22T00:22:20+5:30

राजूर : राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये टप्याटप्प्याने सेमी इंग्लिश सुरू करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली.

Semi-English classes in ashram schools | आश्रमशाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

आश्रमशाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

राजूर : राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये टप्याटप्प्याने सेमी इंग्लिश सुरू करणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली.
येथील प्रकल्प कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पिचड बोलत होते. यावर्षी केवळ संख्यात्मक, नव्हे तर गुणात्मकदृष्ट्याही निकाल वाढला असल्याने पिचड यांनी समाधान व्यक्त केले.
यावर्षी राज्यात एकही नवीन आश्रमशाळा सुरू करण्यात येणार नसून आहे त्याच आश्रमशाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश सुरू करणार आहे. त्यासाठी आवश्यक शिक्षक वर्गही उपलब्ध करून दिला जाणार असून, शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करण्यात येतील. गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अशा विद्यार्थ्यांना राज्यातील नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, त्याचा सर्व खर्च आदिवासी विकास विभागातून करण्यात येणार असल्याचे पिचड म्हणाले.
खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे अनुदान मिळण्यास पूर्वी उशीर होत होता मात्र यावर्षीपासून ते अनुदान आॅनलाईन पद्धतीने थेट संस्थेच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगताना यावर्षीपासून आदिवासी विकास विभागांतर्गत स्वतंत्र शिक्षण विभाग सुरू करणार असून, भोजन व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलींच्या वसतिगृहात स्त्री अधिक्षीका व पहारेकरी नेमण्यात येणार आहे.
यावेळी दहावी-बारावीच्या गुणवंतांचा पिचड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पिचड यांची पुस्तकतुला करून ही पुस्तके वसतिगृहातील मुलांना देण्यात आली. यावेळी नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त सुधीर पाटील, जि.प. सदस्य वैभव पिचड, प्रकल्प अधिकारी डॉ. तुकाराम पिचड, मिनानाथ पांडे, सभापती अंजना बोंबले, बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, प्रा. एम. एम. भवारी उपस्थित होते.(वार्ताहर)
जात पडताळणी शाळा स्तरावरच
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र शाळा स्तरावरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्धवट शिक्षण सोडलेल्या व इतर १ लाख आदिवासी मुलांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, या आर्थिक वर्षाकरीता या योजनेसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री पिचड यांनी दिली.

Web Title: Semi-English classes in ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.