चार हजार उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी चाळणी
By Admin | Updated: April 9, 2016 23:37 IST2016-04-09T23:32:10+5:302016-04-09T23:37:43+5:30
अहमदनगर : पोलीस भरतीच्या विविध चाचण्यांमध्ये मैदानी चाचण्यांमध्ये पन्नास टक्क्यांच्यावर गुण मिळविणारे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

चार हजार उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी चाळणी
अहमदनगर : पोलीस भरतीच्या विविध चाचण्यांमध्ये मैदानी चाचण्यांमध्ये पन्नास टक्क्यांच्यावर गुण मिळविणारे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार पोलीस मुख्यालयात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत तब्बल चार हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांपैकी विविध वर्गवारीसाठी पात्र विद्यार्थ्यांमधून १: १५ या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. लेखी परीक्षा १७ एप्रिल रोजी घेण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे.
नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या ४९ जागांसाठी २९ मार्चपासून नगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली. ११ दिवस सुरू असलेली ही प्रक्रिया शनिवारी (दि. ९) समाप्त झाली. तप्त उन्हामुळे पहाटे साडेचार वाजल्यापासून मैदानी चाचणी घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी तैनात होते. यंदा प्रथमच महिला बचत गटातर्फे उमेदवारांना चहा-पाण्याची व्यवस्था केली होती. यंदाच्या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याने ही भरती प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. या भरती प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावरील ३० जणांना बोलविण्यात आले होते. त्यामध्ये २२ हजर राहिले, तर ८ गैरहजर होते.
परीक्षेस पात्र ठरलेल्यांची मंगळवारनंतर अंतिम यादी
५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये पात्र समजण्यात येणार आहे. पास झालेल्या उमेदवारांपैकी १:१५ या प्रमाणात प्रत्येक कॅटेगिरीप्रमाणे उमेदवारांना १७ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता मैदानी चाचणीमधील गुणांची यादी अहमदनगर पोलीस संकेतस्थळ आणि पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रकाशित करण्यात येणार आहे. गुणांबाबत कोणाचे काही आक्षेप असल्यास ते मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे.