अगस्तीच्या कर्जाचा बोजा पाहून पवारांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:30+5:302021-01-15T04:17:30+5:30

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा पाहून दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच चिंता व्यक्त केली असून ...

Seeing Augusta's debt burden, Pawar expressed concern | अगस्तीच्या कर्जाचा बोजा पाहून पवारांनी व्यक्त केली चिंता

अगस्तीच्या कर्जाचा बोजा पाहून पवारांनी व्यक्त केली चिंता

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा पाहून दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच चिंता व्यक्त केली असून कारखाना ताब्यात घेताना सर्व आर्थिक बाबींचा विचार करा. सभासद शेतकऱ्यांना ही बाब समजून सांगा. ऊस उत्पादकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिला. दरम्यान कारखाना ताब्यात घेवून तो कर्ज फेडीत बंद पडला तर ? याचे खापर आपल्या माथी नको म्हणून साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी सरसावलेली मंडळी थोडी थंडगार झाल्याचे सध्या चित्र आहे.

पूर्वी संपत कमिशनचे फायदे घेऊन अगस्ती साखर कारखाना कर्ज मुक्तीच्या उंबरठ्यावर होता, पण गेल्या पाच वर्षांत ३२४ कोटी कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने सध्या अगस्ती आर्थिक अडचणीत असल्याचे कागदपत्रे समोर आले. ५० कोटींचा इथेनॉल प्रकल्प व ५२ कोटींची साखर मालमत्ता दिसते. २२० कोटी कर्ज हे अनावश्यक खर्च झाले असून कोणत्याही स्वरूपाची स्थावर मालमत्ता निर्माण झाली नाही असा आरोप होत असून ही कागदपत्रे घेवून तालुक्यातील शिष्टमंडळाने थेट ऊस साखर कारखानदारीतील जाणते नेतृत्व शरद पवार यांची पंधरवड्यापूर्वी तर गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शेतकरी नेते दशरथ सावंत, आमदार डॉ.किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे, निवृत्त सनदी अधिकारी बी. जे. देशमुख, विनय सावंत, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे यांचा समावेश होता.

१४१ कोटी मालमत्ता त्यावर ३२४ कोटी कर्ज असून यंदा किमान ७६ कोटी रुपयांची परतफेड अगस्ती कसा करणार ? असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला आहे. साखर संकुल व वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शरद पवार यांनी अगस्तीच्या कारभाराची, कर्जाची, कर्ज परतफेडीची माहिती जाणून घेतली व अगस्ती बाबत चिंता व्यक्त केली आहे. कर्ज मिळाले. सरकार पाठिशी उभे राहिल, पण कर्ज फेडण्यासाठी काय कराल ? शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये. शेतकऱ्यांपर्यंत जा आणि कारखान्याची आर्थिक स्थिती समजून सांगा. उगाच घाईगडबडीत निर्णय घेऊ नका असा सल्ला पवार यांनी दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची याच शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही ठिकाणी चर्चेचा एक सूर निघाला. अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीत असून आपली कामधेनू म्हणून गेली ३० वर्षे सातत्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांनी शेजारील कारखान्यांच्या तुलनेत कमी भाव घेतला आहे.

............

सारासार विचार करून पाऊल टाकावे

स्थावर मालमत्ता कमी, मात्र बोजा वाढवून प्रचंड कर्ज कारखान्यांने घेतले, त्याची परतफेड सभासदांचे नुकसान करणारीच आहे. शेतकरी आणखी किती नुकसान सहन करणार आणि कारखाना विरोधी मंडळीच्या हाती आला तर फरक पडेल का ? याबाबत सारासार विचार करूनच पाऊल उचलायचा हवे असे मत विनय सावंत यांनी व्यक्त केले.

दरम्यान आर्थिक परिस्थिती पाहूनच कर्ज मिळते. अगस्ती कारखान्याकडे कर्ज परतफेड करण्याची क्षमता असून कारखाना आर्थिक डबघाईस गेलेला नाही, असा निर्वाळा यापूर्वीच कारखाना प्रशासनाने दिला आहे.

...................

२४ जानेवारी रोजी शरदचंद्र पवार अकोले दौऱ्यावर येत असून भंडारदरा (शेंडी) येथे दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. यशवंतराव हे पवार सहकारी होते. या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून असून या दिवशी कारखान्याच्या निवडणूकी संदर्भाने अआश्वासक चित्र समोर येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांचेसह सहकारातील नेते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होतील? अशी चर्चा आहे.

दरम्यान संक्रातीच्या पूर्वसंध्येला बुधवारी भाजपचे चंद्रशेखर कदम यांनी अकोलेत येवून सिताराम गायकर यांची भेट घेतली.

Web Title: Seeing Augusta's debt burden, Pawar expressed concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.