सायबर पोलीस उलगडणार ‘त्या सात घटनांचे रहस्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:40 IST2018-02-28T19:39:50+5:302018-02-28T19:40:39+5:30
मागील एक ते दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी समोर आलेल्या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाला असून, स्थानिक पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही. या गुन्ह्यांचे आता सायबर पोलिसांच्या मदतीने रहस्य उलगडण्यात येणार आहे.

सायबर पोलीस उलगडणार ‘त्या सात घटनांचे रहस्य’
अहमदनगर : मागील एक ते दीड वर्षात जिल्ह्यात विविध ठिकाणी समोर आलेल्या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाला असून, स्थानिक पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करता आलेला नाही. या गुन्ह्यांचे आता सायबर पोलिसांच्या मदतीने रहस्य उलगडण्यात येणार आहे.
या आठ घटनांचा सायबर पोलिसांकडे तपास दिल्यानंतर चार दिवसांतच राहुरी येथील तरूणाच्या खुनाचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आरोपीला अटक केली. उर्वरित सात गुन्ह्यांचा तपासही सायबर पोलिसांनी सुरू केला आहे. २०१७ या वर्षात तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत कल्याण बायपास रोडवर एका जळालेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही़ कर्जत तालुक्यातील दूरगावमधील जंगलात एक महिला व दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळून आले होते. तपास करून या मृतांची ओळख पटलेली नसल्याने तपास रखडलेला आहे. नगर शहराजवळील केकताईच्या डोंगरात दोन साधुंची जाळून हत्या झाली. या घटनेचे रहस्य अजून समोर आलेले नाही. तीन महिन्यापूर्वी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अकोळनेर रोडवर एका तरूणाचा जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचीही अजून ओळख समोर आलेली नाही. राहुरी येथे एका महिलेचा मृतदेह आढळला. लोणी येथे दरोड्याच्या घटनेत वृद्ध महिलेचा खून झाला असून, या गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. सुपा पोलीस ठाणे हद्दीतही झालेल्या खुनाचे रहस्य अजून कायम आहे. या आठ घटनांमध्ये दहा जणांचा खून झाल्याचे समोर आले आहे. यातील राहुरी येथील तरूणाचे खुनाचे रहस्य उलगडले असून, उर्वरित सात घटनांचा तपास करण्याचे आवाहन सायबर पोलीस ठाण्यासमोर आहे.
मृतदेहाची ओळख पटलेली नाही
कर्जत, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत पाच जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या मृतदेहांची ओळख अजून समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनांचा तपासही ठप्प आहे. आता गुन्ह्यांचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर राहणार आहे.