सलग दुसऱ्या वर्षी घिसाडी समाजबांधव अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:18+5:302021-04-24T04:21:18+5:30
तिसगाव : पारंपरिक पद्धतीने भात्याच्या सह्याने शेतीसाठी महत्त्वाची असलेली विळे, खुरपे, कुऱ्हाड बनविणारे घिसाडी समाजबांधवांना कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षी ...

सलग दुसऱ्या वर्षी घिसाडी समाजबांधव अडचणीत
तिसगाव : पारंपरिक पद्धतीने भात्याच्या सह्याने शेतीसाठी महत्त्वाची असलेली विळे, खुरपे, कुऱ्हाड बनविणारे घिसाडी समाजबांधवांना कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. यंदाही लॉकडाऊन जाहीर होऊन व्यवसाय बंद झाल्याने तिसगाव (ता.पाथर्डी) परिसरातील ५४० कुटुंबांची उदरनिर्वाहासाठी कसरत सुरू आहे.
कोरोनाच्या संचारबंदीमुळे २७ खेड्यांचे नित्याचे दळणवळण असलेल्या तिसगाव शहरात स्मशान शांतता आहे. शेती उपयुक्त अवजारे दुरुस्तीसह नवीन अवजारे तयार करण्यासाठी शेतकरी व विहीर कामगार फिरकतच नाहीत. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने उपयुक्त असे विळे, खुरपे, कुऱ्हाड तयार करून ठेवावी तर रस्त्यालगतच आमची पाल असल्याने पोलीसदादा रागावतात. त्यामुळे दुहेरी कोंडी झालीय, अशी व्यथा देवीदास पवार, छाया पवार यांनी व्यक्त केली.
तिसगाव शहरात असे हातावर उपजीविका असलेले नऊ कुटुंबे आहेत. प्रत्येक कुटुंबात लहान-मोठी अशी ४३ सदस्य आहेत. जवखेडे, हनुमान टाकळी, निवडुंगे, लोहसर, चिचोंडी, खरवंडी आदी खेडोपाडी वाडी-वस्तींवर एकूण ५४० कुटुंबासह दोन हजार ९०० सदस्य आहेत. हाताला कामाची गरज लक्षात घेऊन हे कुटुंबीय रस्त्याच्या कडेला पाल टाकून रहात आहेत, असे बाबासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
--
मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार..
सरपंच काशीनाथ लवांडे व व्यापारी मित्रमंडळांनी किराणा दिल्याने आधार मिळाला. आम्हाला कष्ट करून खायची सवय हाय. घामाचं दाम समाधान देतं. या संकटातून लवकर सुटका व्हावी, अशी भावना सुरेश साळुंके यांनी व्यक्त केली. बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन घिसाडी कारागिरांच्या व्यथा कळवायच्या आहेत, असे संतोष पडोळकर, रवि पवार यांनी सांगितले.