दुसऱ्या लाटेत २० हजार मुलांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:56+5:302021-07-12T04:14:56+5:30
अहमदनगर : दुसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा लहान मुलांनाही झाली होती. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील मुलांचा मात्र समावेश नव्हता. ११ ...

दुसऱ्या लाटेत २० हजार मुलांना कोरोनाची बाधा
अहमदनगर : दुसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा लहान मुलांनाही झाली होती. त्यामध्ये एक वर्षाच्या आतील मुलांचा मात्र समावेश नव्हता. ११ ते १८ या वयोगटातील सर्वाधिक मुलांना कोरोनाची बाधा झाली होती, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अहवालात म्हटले आहे.
जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ८७५ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात पहिल्या लाटेत ७५ हजार, तर दुसऱ्या लाटेत दोन लाख सहा हजारांवर रुग्ण बाधित होते. पहिल्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झालेली नव्हती. मात्र, दुसऱ्या लाटेत २० हजारांपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत दिली. त्यात ११ ते १८ या वयोगटातील मुले सर्वाधिक होती. एक वर्षाच्या आतील मुले तुलनेने कमीच होती. जिल्ह्यात साधारणपणे दुसऱ्या लाटेत बाधा झालेल्या लहान मुलांचे प्रमाण ११.५० टक्के इतके होते.
------------
वयोगटानुसार बाधित मुले
वयोगट बाधित
० ते १ वर्ष १३२
१ ते १० वर्षे ६२९३
११ ते १८ वर्षे १३९५५
एकूण मुले २०३८०
--------------
जुलै महिन्यात वाढ
जुलै महिन्यात कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे. मात्र, जे बाधित होत आहेत, त्यामध्ये मुलांचे प्रमाण १४.४० टक्के इतके आहे. कोरोनाच्या एप्रिल-मे मध्ये आलेल्या लाटेत हे प्रमाण ९ ते ११ टक्के इतके होते. सध्या जिल्ह्यात चारशे ते पाचशे रुग्ण रोज बाधित होत आहेत. त्यात १४ टक्के हे प्रमाण अत्यंत कमी असले तरी नागरिकांनी मुलांबाबत नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.