दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:37+5:302021-06-09T04:25:37+5:30

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला ...

The second lockdown poisoned marital life! | दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला जाऊन गेल्या पाच महिन्यांत येथील भरोसा सेलकडे तब्बल ८१७ विवाहितांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ९० टक्के तक्रारी या महिलांकडून आलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच दुसरी लाट आली. लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या. कामधंदा नसल्याने २४ तास घरात बसण्याची वेळ आली. आर्थिक अडचणीतून वाढलेली चिडचिड, संकटकाळात एकमेकांना समजून न घेणे यामुळे अनेक कुटुंबात वाद उद‌्भवले. पतीकडून पत्नीला मारहाण, मानसिक छळ, पत्नीच्या वाढलेल्या अपेक्षा अशा एक ना अनेक कारणातून दुरावा निर्माण होऊन आता ‘एकत्र राहायचेच नाही’ या मानसिकतेतून लॉकडाऊन काळातही भरोसासेलकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

.......

१८६ जोडप्यांचा संसार सुरळीत

लॉकडाऊन काळात तक्रारी दाखल झाल्यानंतर भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, हेडकॉन्स्टेबल उमेश इंगवले व इतर कर्मचाऱ्यांनी तक्रारदार महिलेसह तिच्या पतीचे व नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. अशा १८६ जोडप्यांचा संसार पुन्हा नव्याने फुलला आहे. तक्रारीची पडताळणी करून ११२ प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली, तर २३ पीडित महिलांना संरक्षण अधिकाऱ्याची मदत देण्यात आली आहे.

.........

कोरोना से नही साथ रहेनेसे डर लगता है

कोरोनाची भीती वाटत नाही. कोरोना झाला तरी उपचार घेऊन बरे होता येते. मात्र एकत्र राहत असल्याने आमच्यात शुल्लक कारणातून वाद होत आहेत. असे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. पती वेळ देत नाही, मोबाइलवर जास्त बोलतो. पती त्याच्या मैत्रिणींना फोन करतो, घरात पैसे नाहीत, संसार करायचा कसा, सासू-सासरे समजून घेत नाहीत. अशा स्वरूपांच्या तक्रारी आहेत.

........

काय सांगते आकडेवारी

जानेवारी ते मे (२०२१)

८१७ तक्रारी दाखल

४०९ तक्रारींची निर्गती

४०८ तक्रारी प्रलंबित

.......

जानेवारी ते मे (२०२०)

४५० तक्रार दाखल

सर्व तक्रारींची निर्गती

........

कुठल्याही संकटकाळात पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले तर वाद निर्माण होत नाहीत. संसार दोघांचाही आहे, असा विचार करून अडचणीतून मार्ग काढावा. मागील पाच महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींवर काम करत जास्तीत जास्त वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. काही महिलांना पुढील कायदेशीर मदत देण्यात आली. जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातील बंदोबस्त सांभाळून भरोसा सेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित कामही केले. एकही दिवस हे कार्यालय बंद नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त तक्रारी निकाली निघाल्या.

- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल

.........

समुपदेशन प्रभावी मार्ग

बहुतांशी पती-पत्नीमध्ये अगदी शुल्लक कारणावरून वाद उद‌्भवतात. पुढे होणाऱ्या परिणामांची त्यांना जाणीव नसते. अशा परिस्थितीत दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते पुन्हा एकत्र येतात. काही प्रकरणांमध्ये महिलांना पुढील कायदेशीर मदत दिली जाते. तसेच तक्रारदार महिलेवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे भरोसा सेलमधील समुपदेशक तथा हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ व हेड कॉन्स्टेबल उमेश इंगवले यांनी सांगितले.

Web Title: The second lockdown poisoned marital life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.