जामखेड : तालुक्यातील जवळा येथे शनिवारी मध्यरात्री १.१५ वाजता शिवकृपा ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला. गेल्या पंधरा दिवसात चाेरट्यांनी दुसऱ्यांदा या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पंधरा दिवसांपूर्वी शिवकृपा ज्वेलर्स हे दुकान फोडण्याच्या उद्देशाने तीन चोरटे आले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला होता.
जवळा येथील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील जुन्या ग्रामपंचायतीसमोर शिवकृपा ज्वेलर्स हे सोने-चांदी दागिने खरेदी-विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरटे या दुकानाचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या पत्रकार दीपक देवमाने यांना आला. त्यांनी तत्काळ दुकानदार दयानंद कथले यांना दूरध्वनीवरून चोरटे दुकानाचे कुलूप तोडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर कथले हे मोठमोठ्याने ओरडायला लागले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला व दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न फसला. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. दीपक देवमाने, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले, महेश कथले यांनी गावातील युवकांना सोबत घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात चोरांचा शोध सुरू केला. परंतु, चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले. गावात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.