कोरोना नियमांचे उल्लंघन करणारी बारा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:43+5:302021-08-01T04:20:43+5:30
कर्जत : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरासह तालुक्यातील १२ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. नियमांचे पालन होते की नाही, ...

कोरोना नियमांचे उल्लंघन करणारी बारा दुकाने सील
कर्जत : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरासह तालुक्यातील १२ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी प्रशासनाने पथके तैनात केली आहेत.
उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत, मिरजगाव, राशीन, माहीजळगाव येथे महसूलच्या पथकाने कोरोना नियमांचे पालन न करणारी वेगवेगळी दुकाने, मंगल कार्यालये यांच्यावर कारवाई केली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी सात ते चार असा आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी आहे. कोरोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या तसेच सायंकाळी चारनंतरही आस्थापना सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने राशीन येथे विस्तार अधिकारी, तलाठी, राशीनला पोलीस कर्मचारी यांचे पथक, मिरजगाव-माहीजळगाव येथे तहसीलदार, कर्जत शहरात गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, मिरजगावला पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक, यांची भरारी पथके तैनात केली आहेत. अशी तीन पथके आहेत.
या भरारी पथकांनी सायंकाळी चारनंतर राशीन, मिरजगाव, माहीजळगाव, कर्जत शहर येथे अचानक भेटी दिल्या. एकूण बारा आस्थापना या चारनंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले. या आस्थापना पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
भरारी पथकात प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, कृषी अधिकारी रूपचंद जगताप आदी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी, दुकानदार यांना शासनाने घालून दिलेल्या वेळेप्रमाणे आस्थापना सुरू ठेवण्याबाबत व आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. तसेच मंगल कार्यालयात होणारे विवाह समारंभ, इतर कार्यक्रमांसाठी पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी तसे होताना दिसत नाही.
----
कारवाई केलेली दुकाने...
मिरजगाव येथील सुविधा बेकर्स, जाधव किराणा, माहीजळगाव येथील हॉटेल साई सेवा, पांडुरंग बेकर्स, राशीन येथील आशीर्वाद कापड दुकान, प्रिया जनरल स्टोअर्स, संतोष केशभूषा, दत्त कुशन, दीपक मेन्स पार्लर, कर्जत येथील जगदंबा कलेक्शन, हॉटेल फिरोज, निलायम मेन्स वेअर या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
---
३१कर्जत कारवाई
राशीन येथील एका कापड दुकानावर कारवाई करताना भरारी पथक.