अहमदनगर : भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत आहुती देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्याचा हा दिवस. मात्र, याच हुतात्म्यांचे स्मारक असलेल्या महावीर कला दालनातील पेन्सिल चित्रावर धूळ साचली आहे. महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यावर ही धूळ झटकण्याची वेळ आली.
अहमदनगर येथील महावीर कलादालनात २५ वर्षांपूर्वी चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ७० बाय २० फूट आकाराच्या दर्शनी भिंतीवर भारतमाता आणि तिच्या ५०१ सुपुत्रांचे पेन्सिल स्केच तयार करण्यात आले होते. हे पेन्सिल चित्र आजही महावीर कला दालनातील भिंतीवर पाहायला मिळते. या भिंतीवर तयार झालेली ही प्रतिकृती जगातील एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना या चित्रांची दुर्दशा कांबळे यांना पाहावली नाही. त्यांनी हाती झाडू घेऊनच या भिंतीची साफसफाई केली.
--------------
मला या चित्रावर जाळे तयार झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक लोक या महावीर कलादालनात हे चित्र पाहावयास जातात. मात्र, त्यांची निराशा होते. सध्या ही वास्तू महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने याकडे कोणीच लक्ष देत नाही. म्हणून आज स्वत: हे साफ करण्याचे ठरविले. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक लोक हे चित्र पाहायला येतील, म्हणून ही साफसफाई केली.
-प्रमोद कांबळे, चित्रकार
---------------
फोटो-१४ महावीर कलादालन
महावीर कलादालनात चित्रकार प्रमोद कांबळे यांनी स्वत: हाती झाडू घेऊन साफसफाई केली.