भंगारच्या गोदामास भीषण आग
By Admin | Updated: March 3, 2017 22:57 IST2017-03-03T22:57:55+5:302017-03-03T22:57:55+5:30
वीजेच्या शाॅर्ट सर्कीट मुळे शहरातील बैल बाजार मधील भंगारच्या गोदामास शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता भीषण आग लागून सुमारे 40-50 लाखांचे नुकसान झाले.

भंगारच्या गोदामास भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
कोपरगाव, दि. 03 - वीजेच्या शाॅर्ट सर्कीट मुळे शहरातील बैल बाजार मधील भंगारच्या गोदामास शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता भीषण आग लागून सुमारे 40-50 लाखांचे नुकसान झाले. अडीच-तीन तास धगधगणारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
याबाबत वृत्त असे, शहरातील भरवस्तीच्या बैल बाजार परिसरात हाजी सद्दाम हुसेन सय्यद यांचे भंगार दुकान व गोदाम आहे. आज रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वीजेचे शाॅर्ट सर्कीट होवून भंगार गोदामास आग लागली. गोदामात रद्दी, प्लॅस्टीक, लाकुड व इतर साहित्य असल्याने काही क्षणात आगीचे लोळ सर्वत्र पसरले. आगीच्या ज्वाला प्रचंड प्रमाणात भडकल्याने संपूर्ण परिसर ग्रासला गेला. आगीची माहिती समजताच मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. संजीवनी साखर कारखाना, काळे साखर कारखाना, नगरपालिका, शिर्डी साई संस्थान आदी ठिकाणाहून अग्नीशामक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पाणी पुरवठा सभापती
अरीफ कुरेशी, नगरसेवक जनार्दन कदम, स्वप्नील निखाडे, हाजी महेमूद सय्यद, मंदार पहाडे, रविंद्र पाठक,राजेंद्र सोनवणे आदींसह अनेकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. आगीचे लोण वाढल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.
आगीत 40-50 लाखांचे नुकसान झाले आहे. सय्यद यांनी कर्ज काढून व्यवसाय भरभराटीस आणला होता. मात्र या भीषण आगीत राखरांगोळी झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.