सायन्स कटआॅफ ९५ टक्क्यांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:39 IST2016-06-25T00:35:46+5:302016-06-25T00:39:22+5:30
अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात

सायन्स कटआॅफ ९५ टक्क्यांच्या पुढे
अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी गुणवंतांना चांगलेच झुंजावे लागणार आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया व रेसिडेन्सिअलचा खुल्या वर्गातून विज्ञान शाखेचा कट आॅफ ९५ टक्क्यांचा आहे.
दि. १४ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. दि. १८पर्यंत अर्ज स्वीकृती झाल्यानंतर २१ जूनला सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. २२ व २३ असे दोन दिवस या यादीवर विद्यार्थ्यांना असलेले आक्षेप स्वीकारण्यात आले. अर्ज भरूनही यादीत नाव नसणे, आरक्षण बदलणे, गुणात बदल अशा अनेक आक्षेपांची दुरूस्ती झाल्यानंतर २४ जून रोजी सकाळी सर्व महाविद्यालयांनी आरक्षणासह पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली.
यात विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली असून, प्रमुख महाविद्यालयांचे कट आॅफ ९५च्या पुढे गेले आहेत. वाणिज्यची गुणवत्ता यादी ७५ ते ९०च्या आसपास आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे जागा रिक्त राहू नये म्हणून कला शाखेला खुला प्रवेश देण्यात येत आहे. परिणामी या शाखेची गुणवत्तायादीच प्रसिद्ध झालेली नाही. जो येईल त्याला प्रवेश असे सर्वच महाविद्यालयांचे धोरण आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शनिवारपासून (दि. २५ ते २७) सुरू होत आहेत. यानंतरही जागा रिक्त राहिल्या तर दि. २८ जूनला पहिली, दि. १ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. दि. ९ ते १३ जुलैदरम्यान विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश होणार आहेत. सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १४ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत.
(प्रतिनिधी)