शाळेचा दाखलाच रहिवासी पुरावा
By Admin | Updated: August 24, 2014 02:06 IST2014-08-24T02:01:40+5:302014-08-24T02:06:07+5:30
श्रीरामपूर : दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला हाच रहिवासी दाखला गृहीत धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे दिली.

शाळेचा दाखलाच रहिवासी पुरावा
श्रीरामपूर : दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला हाच रहिवासी दाखला गृहीत धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे दिली.
श्रीरामपुरच्या तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष कांचन सानप, अधीक्षक अभियंता हरिष पाटील, जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री थोरात म्हणाले, राज्यात तालुकास्तरावरची श्रीरामपूरमधील एकमेव देखणी प्रशासकीय इमारत आहे. आर. टी. ओ. कार्यालय बांधून ठेवल्याने आता हे कार्यालय आम्हाला नेताच येणार नाही. लोकप्रतिनिधी शाबासकीला, चांगले म्हणायला भुकेले असतात. सरकार कसे हे सामान्यांना कशी वागणूक मिळते, यावर अवलंबून असते.
सामान्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न महसूल खात्याने केला. त्यासाठी अनेक जुने किचकट नियम बदलून सुलभतेसाठी चांगले निर्णय घेतले. विकास आराखडा लागू नसेल तेथे एन. ए. साठी लागणारे दाखले जमा करण्याची जबाबदारी सरकारची राहील. स्वतंत्र रहिवासी दाखल्याऐवजी १५ वर्षे राज्यातील वास्तव्य सिद्ध करणारा दहावीचा शाळा सोडल्याचा दाखलाच गृहीत धरला जाईल, असे सामान्यांना सहजतेने साध्य होईल, असे निर्णय घेतले.
या इमारतीत कारागृह व स्ट्रॉँग रूम राहिले असून त्याची पूर्तता करण्याची सूचना तहसीलदार किशोर कदम यांनी प्रास्ताविकातून केली. कार्यकारी अभियंता एस. एस. लोळगे यांनी ५१ चौरस फूट क्षेत्राची १० कोटी ३० लाख रूपये खर्चाची ही इमारत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी क्षमतावृद्धी करुन तत्पर, प्रभावी, लोकाभिमुखेवर आधारित सेवा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी द्यावी, असे सांगितले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी पिकांसोबतच गावतळे भरून नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली.
जयंत ससाणे यांनी मध्यवर्ती इमारत, टाऊन हॉल, स्टेडीयम अशा शहराच्या मुलभूत आवश्यक सोयीसुविधा पूर्ण झाल्या असून जलसंधारणासाठी व इतर प्रस्तावांसाठी शेती महामंडळाच्या जागांना मंजुरी देण्याची मागणी केली. बी. सी. नाल्यासाठी १५० एकर जागा मंजूर झाल्याचे ते म्हणाले. आदिनाथ जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार दिपाली गवळी थविल यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)