शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: February 22, 2017 04:18 IST2017-02-22T04:18:42+5:302017-02-22T04:18:42+5:30
मोहोजदेवढे (बहिरवाडी) येथील सहा शालेय विद्यार्थ्यांनी बिलायताच्या बियामधील गर खाल्ल्याने

शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा
पाथर्डी (अहमदनगर) : मोहोजदेवढे (बहिरवाडी) येथील सहा शालेय विद्यार्थ्यांनी बिलायताच्या बियामधील गर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यातील तिघांना गावातील खासगी, तर तिघांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे.
मंगळवारी सकाळी बहिरवाडी येथील शालेय विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी घराशेजारी खेळत होते. साईनाथ नाना फरतारे (७), गहिनीनाथ दादा फरतारे (१२), वैभव पोपट कराळे (१०), कृष्णा दादा फरतारे (५), गीता दादा फरतारे (९), साधना बंडू लोखंडे (७) यांनी भुईमुगाच्या शेंगा समजून बिलायताच्या बियामधील गर खाल्ला. त्यामुळे या मुलांना उलट्या होऊ लागल्या. काहीच्या तोंडातून फेस येऊ लागला.
कृष्णाचे आजोबा यमाजी शेजारी शेतात काम करीत होते. त्यांनी कृष्णाला सतत उलट्या येत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मुलांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. ‘बिलायताच्या बिया खाल्ल्याने मुलांना त्रास झाला आहे. त्यांची प्रकृती आता हळूहळू सुधारते आहे. तरीही काही काळ त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येईल,’ असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा खेडकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)