मावसभावाकडून शाळकरी मुलाचे अपहरण
By Admin | Updated: June 19, 2016 23:12 IST2016-06-19T23:04:58+5:302016-06-19T23:12:08+5:30
शेवगाव : तालुक्यातील हसनापूर येथील आजिनाथ भगवान ढाकणे (वय १०) शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रकार शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघडकीस आणला.

मावसभावाकडून शाळकरी मुलाचे अपहरण
शेवगाव : तालुक्यातील हसनापूर येथील आजिनाथ भगवान ढाकणे (वय १०) शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रकार शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघडकीस आणला. मावस भावाने मुलाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर मुलास पोलिसांनी रविवारी सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, आजिनाथ भगवान ढाकणे हा शाळकरी मुलगा शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास शाळेतून घरी न पोहचल्याने त्याचे वडील भगवान बाजीराव ढाकणे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर व सहाय्यक भाऊसाहेब खाटीक यांनी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने चक्रे फिरवत चौकशी केली असता भगवान बाजीराव ढाकणे यांना एका मोबाईल वरून निनावी फोन आला. या फोनवरून तपास पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला असता सदर मुलगा शाळा सुटल्यानंतर त्याच्या मावस भावाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. मावस भावाकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच मावस भावाने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने १८ रोजी आजिनाथ यास शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने स्वत:च्या गाडीवरून शास्त्रीनगर मधील स्वत:च्या खोलीवर नेऊन ठेवले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेवगावमधील एका मित्राच्या रूमवर नेऊन ठेवले व त्यानंतर आजिनाथच्या वडिलांना धमकीचा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच फोन मुळे हे अपहरण नाट्य उघडकीस येण्यास मोठी मदत मिळाली.
(तालुका प्रतिनिधी)