शाळा भरल्या ‘दप्तरा’विना

By Admin | Updated: October 16, 2016 01:00 IST2016-10-16T00:39:14+5:302016-10-16T01:00:08+5:30

अहमदनगर : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस नगर तालुक्यात ‘वाचन प्रेरणा’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

The school is filled without 'Daptara' | शाळा भरल्या ‘दप्तरा’विना

शाळा भरल्या ‘दप्तरा’विना


अहमदनगर : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस नगर तालुक्यात ‘वाचन प्रेरणा’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील ३४९ शाळांमधील सुमारे ६१ हजार विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले. यावेळी ग्रंथदिंडी तसेच गावांमधून प्रभातफेरी काढून वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्यास किमान १० छोटी पुस्तके वाचण्यास देण्यात आली होती. तत्पूर्वी परिसरातून मुलांनी ग्रंथदिंडी व प्रभातफेरी काढून वाचन संस्कृतीचे महत्व याविषयी जनजागृती केली. प्रत्येक गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच गावातील इतर पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांनाही वाचनाचे महत्व समजावून सांगण्यात आले. आज मुलांनी शाळेत दप्तर आणले नव्हते. आजचा दिवस ‘दप्तर मुक्त दिन’ म्हणूनही साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आज कोणत्याच विषयाचे अध्यापन झाले नाही. फक्त वाचन संबंधित कार्यक्रम घेण्यात आले. काही शाळांनी वर्तमानपत्रातील अग्रलेख, इ लायब्ररीमार्फत सामूहिक वाचन करण्यात आले. आजचा वाचन दिन साजरा केला.
यापुढे शाळेत येणाऱ्या मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ न देता पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय सर्व शाळांनी घेतला, असल्याचे गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी सांगितले.
सुरेशनगर शाळा
नेवासा फाटा: दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम जयंती आदर्श गाव सुरेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे संत किसनगिरीबाबा वाचनालयात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेते, गावाचे मार्गदर्शक व वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग उभेदळ होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख अशोकराव घाडगे, मुख्याध्यापक दिनकर बानकर, भगवान दळवी, उपसरपंच साहेबा सावंत, अण्णासाहेब क्षीरसागर, अविनाश उभेदळ, अध्यापक तोडमल, श्रीमती तिकोणे हजर होते. उभेदळ यांनी वाचनालयातील ज्ञानात भर घालणारी पुस्तके वाचून दर आठवड्यातून वाचनालयासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. केंद्रप्रमुख घाडगे म्हणाले, संत किसनगिरी बाबा वाचनालयात शिपाई भरती पासून आयएएस स्पर्धा परीक्षेची पुस्तके आहेत. वाचनालयात ज्ञानाचा महासागर असून वाचकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कलाम यांच्या जयंतीपासून सुरेशनगर प्राथमिक शाळा दर शनिवारी ‘दप्तर मुक्त शाळा’ राहीन. वाचनालयात विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एकदा भेट देऊन वाचनालयातील पुस्तकांचा आनंद घ्यावा असे आवाहन पांडुरंग उभेदळ यांनी केले. मुख्याध्यापक दिनकर बानकर यांनीही मुलांनी वाचनाला प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले.
शेवगावमध्ये पुस्तकांचे वाचन
शेवगाव : बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ए.पी. जे. या आकारत बसून पुस्तकांचे वाचन केले. अनुबंध प्रकाशन, पुणे यांनी शाळेला पाच हजाराची दर्जेदार पुस्तके तर रोटरी क्लबने पंधरा हजाराची पुस्तके भेट दिली. रोटरीचे अध्यक्ष गणेश चेके, सदस्य भागिनाथ काटे, बबन म्हस्के यांच्याहस्ते ही पुस्तके मुख्याध्यापक गोरख बडे व विश्वस्त हरिश भारदे यांनी स्वीकारली. तुकाराम चिक्षे, सिद्धी उरणकर, साक्षी बैरागी यांनी आवडत्या पुस्तकांची ओळख करून दिली. आबासाहेब काकडे विद्यालय, रेसिडेन्शिअल हायस्कूल, आदर्श विद्यालय येथेही अब्दूल कलम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उर्दू शाळेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पुस्तक वाचन केले. भापकर वस्ती जिल्हा परिषद शाळेने दप्तरमुक्त शाळा घेऊन प्रत्येक मुलाकडून एका पुस्तकाचे वाचन करून घेतले. जिल्हा परिषदेच्या माळीवाडा, खामगाव ,थोरात वस्ती, भगूर येथील शाळांमध्येही वाचन प्रेरणा दिन पार पडला.

Web Title: The school is filled without 'Daptara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.