शिर्डीत दरवळणार निर्माल्याचा सुगंध

By Admin | Updated: April 9, 2016 00:32 IST2016-04-09T00:18:25+5:302016-04-09T00:32:47+5:30

अण्णा नवथर, अहमदनगर अहमदनगर : भाविकांनी देवाला फुले अर्पण केल्यानंतर काहीवेळातच ही फुले मूर्तीवरून काढली जातात. नंतर निर्माल्यात रुपांतर झालेली फुले एकत्र करून गावाबाहेर उघड्यावर टाकली जातात.

The scent of the crew of Shirdi | शिर्डीत दरवळणार निर्माल्याचा सुगंध

शिर्डीत दरवळणार निर्माल्याचा सुगंध

अण्णा नवथर, अहमदनगर
अहमदनगर : भाविकांनी देवाला फुले अर्पण केल्यानंतर काहीवेळातच ही फुले मूर्तीवरून काढली जातात. नंतर निर्माल्यात रुपांतर झालेली फुले एकत्र करून गावाबाहेर उघड्यावर टाकली जातात. मात्र या फुलांवर प्रक्रिया करून त्यापासून अत्तर व लगदा बनविण्याचा उद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम विभागामार्फत सुरू आहेत. त्यामुळे देवालयातील फुलांचा सुगंध पुन्हा दरवळणार आहे़ या प्रक्रियेचा पहिला प्रयोग शिर्डी व शिंगणापूरमध्ये करण्यात येणार आहे़
केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्यावर सरकारने भर दिला आहे़ राज्यातील देवस्थानांसह पर्यटनस्थळे सरकारने लक्ष्य केली आहेत. देवस्थान परिसरातील निर्माल्यावर प्रक्रिया करण्यासाठी कारखाना उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत़ सुक्ष्म व लघु आणि मध्यम उपक्रम राज्यमंत्री गिरीराज सिंह गेल्या महिन्यात शिर्डी व शिंगणापूरला आले होते. या भेटी दरम्यान शिंगणापूर व शिर्डी येथील निर्माल्याचा त्यांनी आढावा घेतला होता.
शिर्डी आणि शिंगणापुरला रोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात़ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुले साचतात़ त्यावर प्रक्रिया करून सुगंधी तेल व लगदा तयार करण्यात येणार आहे. साईचरणी अर्पण केलेल्या फुलांपासून बनविलेल्या सुगंधी तेलाला चांगली मागणी येईल. तसेच त्यातून संस्थानला चांगले उत्पन्न मिळेल आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे शक्य होईल़
शिर्डीत रोज २ मेट्रीक टन फुले
शिर्डीमध्ये दररोज २ मेट्रीक टन फुले साचतात़ त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही़ हे निर्माल्य शहराबाहेर टाकले जाते़ शिंगणापूर येथील शनी मंदिरातील फुलांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे या फुलांवर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत गिरीराजसिंह यांनी जिल्हा उद्योग केंद्रांचे अधिकारी, देवस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली आहे़ विश्वस्तांनीही प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे़ सरकार त्यासाठी अनुदान व यंत्रसामुग्री पुरविणार असून, हा प्रक्रिया उद्योग देवस्थानने चालवायचा आहे़ त्यातून देवस्थानला उत्पन्न मिळेल़ रोजगारनिर्मिती होणार आहे़
शिर्डीसह जिल्ह्यातील देवालयांत रोज कितीतरी फुले साचतात़ त्यावर प्रक्रिया होत नाही़ त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सरकारकडून यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे़ देवस्थानने ही प्रक्रिया करावी, अशी ही संकल्पना असून, याबाबत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाकडून मार्गदर्शन केले जाईल़
- सतीष भामरे,
महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र

Web Title: The scent of the crew of Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.