सकाळी भुरभुर.. दिवसभर वेगवान वारा.. सायंकाळी थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:44+5:302021-07-31T04:22:44+5:30
अहमदनगर : सकाळी पावसाची काहीसी भुरभुर.. दिवसभर वेगवान वारा.. सायंकाळी हिवाळ्यासारखी बोचरी थंडी असे विचित्र हवामान सध्या जिल्ह्यात आहे. ...

सकाळी भुरभुर.. दिवसभर वेगवान वारा.. सायंकाळी थंडी
अहमदनगर : सकाळी पावसाची काहीसी भुरभुर.. दिवसभर वेगवान वारा.. सायंकाळी हिवाळ्यासारखी बोचरी थंडी असे विचित्र हवामान सध्या जिल्ह्यात आहे. अशा विचित्र हवामानाने आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने बहरलेली खरीप हंगामातील पिके संकटात सापडल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही चांगले पाऊसमान राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. तसा अगदी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात अल्पावधीतच खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने लपंडाव सुरू केला. गेल्या पंधरा दिवसांपासून तर हवामानात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवस दिवसभर उन्हाचा चटका असायचा. रात्री पावसाचे वातावरण व्हायचे. मात्र, पाऊस येत नसे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हवामानात बदल झाला. आता सकाळी पावसाची काहीसी भुरभुर असते. दुपारी वेगवान वारा. सायंकाळी बोचरी थंडी, असे विचित्र हवामान सध्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सध्या खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, उडीद, मूग, साेयाबीन अशी पिके जोमात आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही भागात पिके सुकू लागली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता आहे. सध्या तरी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत.
----
‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या परिणामामुळेच पावसाचा लहरीपणा वाढला आहे. सध्या कमी व जास्त भाराचे पट्टे तयार होत आहेत. जास्त भाराकडून कमी भाराकडे जोराचा वारा वाहतो. त्यासोबत बाष्पयुक्त ढग ओढले जातात. त्यामुळे जोरदार पाऊस होतो. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात अचानक कमी भाराचे पट्टे तयार झाल्यानेच तेथे पावसाने धुमाकूळ घातला. त्या भागात पाऊस होत असल्यानेच आपल्या जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथे पोकळ ढग, जोराचा वारा, थंड हवा सुटते.
- बी. एन. शिंदे,
हवामान तज्ज्ञ, अहमदनगर