सावित्रीच्या लेकींनी उत्तुंग यशाची आस ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:53+5:302021-01-04T04:18:53+5:30
अहमदनगर : सावित्रीचा वसा आणि वारसा आजही वाटतो तितका सोपा नाही. सावित्रींनी आजच्या प्रगतीवर न थांबता उत्तुंग यशाचा ...

सावित्रीच्या लेकींनी उत्तुंग यशाची आस ठेवावी
अहमदनगर : सावित्रीचा वसा आणि वारसा आजही वाटतो तितका सोपा नाही. सावित्रींनी आजच्या प्रगतीवर न थांबता उत्तुंग यशाचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ सैनिक भालचंद्र आपटे यांनी केले.
विचारधारा व राष्ट्र सेवादल व जिज्ञासा अकादमीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सावित्री उत्सवाचे उद्घाटन आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कॉ. बाबा आरगडे होते. सावित्रीचा शैक्षणिक वारसा चालवणाऱ्या शारदा पोखरकर, सत्यभामा शिंदे, डॉ. निशात शेख, मनीषा बनकर यांना सावित्री-फातिमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अविनाश घुले, बापू जोशी, सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. सूचिता धामणे, शोभा ढेपे, विठ्ठल बुलबुले आदी उपस्थित होते.
आपटे म्हणाले, नुसता उत्सव करून थांबायचे नाही. सावित्री, फातिमा व म. जोतिबांचे विचार समाजात कसे रुजतील, हे पहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी, अरुण आहेर व शिवाजी नाईकवाडी यांनी सावित्री गीतगायन केले. सावित्री विचारपुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले. ‘सावित्री वदते...’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सूचिता धामणे यांच्या हस्ते करण्यात आले. निमंत्रक म्हणून विठ्ठल बुलबुले यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. प्रास्ताविक जिज्ञासाच्या संचालिका संगीता गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा घोलप यांनी केले. आभार राष्ट्र सेवादलाचे विवेक पवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
...................
सावित्रीमुळेच महिलांकडे नेतृत्व
स्त्रियांना पुराणातील सती सावित्री माहिती आहे. मात्र, ज्या सावित्रीमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत अत्यंत सन्मानाने त्या नेतृत्व करीत आहेत त्या सावित्रीला आजच्या महिला विसरल्या असून, त्या बुवा-बाबांच्या नादी लागल्या आहेत. हे आता बंद झाले पाहिजे. समाजाला दांभिकतेपासून लांब ठेवले पाहिजे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आरगडे यांनी सांगितले.
..................
सावित्रीबाईंच्या पुतळ्यासाठी पाठपुरावा करणार -घुले
अहमदनगर शहरात सवित्रीबाईंचा पुतळा उभा राहावा म्हणून सावित्री उत्सव व नगरमधील सर्व पुरोगामी संघटनांना सोबत घेऊन प्रयत्न करणार आहे. सावित्री उत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून आयुष्यभर पुरेल इतकी प्रेरणा या कार्यक्रमामुळे मिळाली, असे अविनाश घुले यांनी सांगितले.
..............
०३ बुलबुले
सावित्री-फातिमा पुरस्कार विरतणप्रसंगी भालचंद्र आपटे, बाबा आरगडे, डॉ. सूचिता धामणे, अविनाश घुले, विठ्ठल बुलबुले आदी.