सावेडीमुळे मनमाड रस्ता बनला विकासाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:41+5:302021-05-28T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर शहरातील जुन्या गावठणातील नागरिकांनी दिल्ली गेटच्या बाहेर आपले बस्तान बसविले. सावेडीच्या या विस्ताराला ...

सावेडीमुळे मनमाड रस्ता बनला विकासाचा मार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर शहरातील जुन्या गावठणातील नागरिकांनी दिल्ली गेटच्या बाहेर आपले बस्तान बसविले. सावेडीच्या या विस्ताराला शिर्डीकडे जाणारा नगर-मनमाड हा रस्ता आधार बनला. गजबजलेल्या सावेडीकरांच्या सेवेसाठी नवी दुकाने, शो रूम, विविध कंपन्या सुरू झाल्या. एमआयडीसीमुळे बोल्हेगाव, नवनागापूरसारख्या ग्रामीण भागापर्यंत हा विस्तार वाढत गेला. वाढत्या वसाहतीला पूरक म्हणून नवे व्यवसाय, उद्योग सुरू झाले. त्यामुळेच नगर-मनमाड रस्ता हा विकासाभिमुख रस्ता म्हणून नावारुपाला आला.
अहमदनगरला लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे जामखेड रोड, सोलापूर रोड, औरंगाबाद रोडचा काही भागात विकासाला मर्यादा आल्या. त्यामुळे मूळचे नगरकर असणारे आणि बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी राहण्यासाठी सावेडीला सर्वाधिक जास्त पसंती दिली. त्यामुळे औैरंगाबाद रोड ते मनमाड रोड यामधील भागात राहणाऱ्यांची संख्या वाढली. या नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी महापालिकेलाही सर्वाधिक शक्ती खर्च करावी लागली. पूर्वी जुन्या नगरमध्ये राहणारे ७० टक्के नागरिक आता सावेडीत राहत आहेत. जुन्या गावात अतिक्रमणे, अरुंद गल्ली-बोळ्या, दुकानांसमोर पार्किंगसाठी जागा नसणे या कारणामुळे व्यापारी, दुकानदार, नागरिक सर्वच त्रासले होते. त्यामुळे सावेडीत राहणे, तिथे व्यवसाय करणे याला जास्त पसंती मिळाली, सोबतच नगर-मनमाड हा उत्तरेकडे जाणारा मोठा महामार्ग व्यावसायिकांना खुणावत होता. त्यामुळे व्यवसाय, उद्योग, नवे धंदे याच रस्त्याच्या लगत सुरू झाले. मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. सर्व प्रकारच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची शोरूमही याच रस्त्यावर आहेत. बिग बाजार, हॉटेल, नवे मॉल, शो-रूम, कापड, ज्वेलरी आदी दुकाने याच रस्त्यावर उभी राहिली.
------------------
वैशिष्ट्ये
शिर्डीला जाणारा रस्ता म्हणून प्रसिद्ध
सावेडीमधील रहिवाशांमुळे व्यवसाय वृद्धी
मोठ्या-मोठ्या इमारती, मॉल,शोरूमची उभारणी
एमआयडीसी, नवनागापूरमुळे विस्ताराला बळ
सुरक्षित व हवेशीर वातावरण
----------------------
२०१२-२०१३ पासून मनमाड रोडवर नव्या इमारतींची उभारणी सुरू झाली. ग्राहकांना दुकानात येण्यासाठी सर्वात सोयीची जागा म्हणजे मनमाड रोड आहे. म्हणूनच या भागात सर्वाधिक विस्तार होत आहे. बँकांच्या शाखाही याच रोडवर आहेत. उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी नव्या इमारतींचे बांधकाम झपाट्याने वाढले. नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनी सर्वाधिक स्थलांतर याच रस्त्यावर केले आहे.
-सागर कायगावकर, व्यावसायिक
-----------------
एमआयडीसीमुळे नवनागापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी आले. या भागात मिळणारी सुरक्षितता, सुविधा यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योजक यांनी त्यांच्या व्यवसायाला नगर-मनमाड रोडवर सर्वाधिक पसंती दिली. त्यामुळे जिल्हा रुग्णालय ते एमआयडीसीच्या पुढेही नगर शहराचा विस्तार वाढत आहे. काही भाग महापालिका हद्दीत येत नसला तरी याच भागामुळे नगर शहराच्या विकासात, प्रगतीत भर पडत आहे, हे नाकारून चालणार नाही.
-अप्पासाहेब सप्रे, उद्योजक
------------
फोटो- नगर-मनमाड रोड