सावेडी हादरली, पोलीस झोपेत
By Admin | Updated: July 23, 2014 00:16 IST2014-07-22T23:14:14+5:302014-07-23T00:16:04+5:30
अहमदनगर: सावेडी परिसरामध्ये एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. त्याआधी आठ दिवसांमध्ये तीन-चार चोऱ्या झाल्या.
सावेडी हादरली, पोलीस झोपेत
अहमदनगर: सावेडी परिसरामध्ये एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. त्याआधी आठ दिवसांमध्ये तीन-चार चोऱ्या झाल्या. या गुन्ह्यांमध्ये तपास शून्य असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी वाय. डी. पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा तपास करणारी शाखा (डिटेक्शन ब्रँच) बरखास्त केली. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाटील यांच्या दणक्याने झोपेत असलेल्या तोफखाना पोलिसांना चांगलाच करंट बसला आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास सावेडी परिसरात चोरीच्या दोन घटना घडल्या. गुलमोहोर रोडवरील तांबटकर मळ््यातील चंद्रहास व्यंकटराव देशमुख त्यांच्या घरामध्ये झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी घराच्या मागील बाजुच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.
त्यांच्याघरी त्यांची मुलगी नीलिमा सुबोध जोशी या बाळंतपणासाठी आल्या होत्या. तसेच त्यांच्या बाजूला झोपलेल्या सुरेखा देशमुख यांना चोरट्यांनी धमकावले. दगडाने मारहाणही केली. दोघींच्या गळ््यातील, हातातील, पर्समधील ५९ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरली. या घटनेने जोशी कुटुंबिय हादरले.
गेल्या आठ दिवसांमध्ये सावेडी परिसरात जबरी चोऱ्यांचे दोन-चार प्रकार घडले आहेत. मात्र त्या गुन्ह्यातील एकही आरोपी हाती न लागल्याने वाय.डी. पाटील चांगलेच संतापले होते. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या शाखेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
डी.बी. शाखेवर विसंबून न राहता पाटील यांनी तातडीने त्यांच्या निरीक्षणाखाली विशेष पोलीस पथकाची स्थापना केली आहे. त्यांना गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यातील डीबी शाखेत सध्या सात पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शेरकर, भोसले, कदम, पवार, भागवत, डाके, हिंगडे अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)
एकही आरोपी हाती लागला नाही
सावेडी भागामध्ये पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड आदी ठिकाणी झालेल्या चोरी, मंगळसूत्र चोरीच्या घटनेतील एकही आरोपी हाती लागलेला नाही. त्यामुळे डी. बी. शाखा अस्तित्त्वात असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. जो तपास करेल तोच डीबी शाखेत राहील. ज्यांना तपास करायचा नाही, त्यांना पोलीस निरीक्षकांनी अन्य कामे द्यावीत.सावेडीतील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उघड न झाल्याने डीबी शाखा बरखास्त करण्यात आली. विशेष शाखा आता गुन्ह्यांचा तपास करेल.
-वाय.डी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी