सतीश अडगटला : नाट्य व्यवस्थापन क्षेत्रातील मानबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:10+5:302021-04-05T04:18:10+5:30

------------------- नाट्यवेडे कुटुंब १९५०-६० च्या दशकात सतीश यांचे वडील दत्तात्रय अडगडला यांनी नाट्य व्यवस्थापनाची सुरुवात केली. बागडी थिएटरशी ...

Satish Adgatla: Manabindu in the field of drama management | सतीश अडगटला : नाट्य व्यवस्थापन क्षेत्रातील मानबिंदू

सतीश अडगटला : नाट्य व्यवस्थापन क्षेत्रातील मानबिंदू

-------------------

नाट्यवेडे कुटुंब

१९५०-६० च्या दशकात सतीश यांचे वडील दत्तात्रय अडगडला यांनी नाट्य व्यवस्थापनाची सुरुवात केली. बागडी थिएटरशी (आजचे छाया थिएटर) त्यांचा संबंध आला आणि नंतर हौशी नाट्य मंडळी म्हणून त्यांनी फिरोदिया हायस्कूलचे मोने कला मंदिरमध्ये नाटकाशी संबंधित सर्व कामे केली व मुलीच्या नावाने ‘नाट्य नलिनी’नामक नाट्य संस्थेची स्थापना केली. त्यांचाच वारसा पुढे नेत दिलीप अडगटला व सतीश अडगटला बंधूंनी १९६५ च्या आसपास नाट्य व्यवस्थापनाचे कार्य मोठ्या जोमाने पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मोने कला मंदिर, सर्जेपुरातील ओट्यावरील नाटक, रंगभवन, सहकार सभागृह या ठिकाणी नाटकाचे प्रयोग केले. ‘नाट्य शलाका’ नावाची नाट्य संस्था सुरू करण्यात सतीश अडगटला यांचा मोलाचा वाटा होता.

अभिजात कला म्हणून पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये नाट्य निर्मिती व प्रस्तुती होत असताना अहमदनगरसारख्या छोट्या शहरात नाट्य रसिकांमध्ये नाटकाची अभिरुची निर्माण करून व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी नाटक सर्वसामान्य नाट्यरसिकांपर्यंत घेऊन जाण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. कधी स्वतः नाटक कंपनीकडून नाटक घेऊन तर कधी ठेकेदारामार्फत नाटक घेऊन त्यांनी नाट्य रसिकांची अविरत सेवा केली. देव दीनाघरी धावला, घाशीराम कोतवाल, घरोघरी हीच बोंब, तो मी नव्हेच, वाहतो दूर्वांची जुडी, काचेचा चंद्र, डॉक्टर, सूर्यास्त, हिमालयाची सावली, नटसम्राट, एकच प्याला, कस्तुरी मृग, विच्छ माझी पुरी करा, कथा अकलेच्या कांद्याची, पुरुष, ययाती देवयानी, गाढवाचं लगीन, मोरूची मावशी, वऱ्हाड निघालंय लंडनला, ऑल द बेस्ट अशा अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग त्यांनी अहमदनगरमध्ये केले. हे कार्य करीत असताना फायद्या-तोट्याचा विचार न करता केवळ अहमदनगर शहरातील व खेड्यापाड्यातील सर्वसामान्य रसिकांपर्यंत नाटक पोहोचले पाहिजे, हा त्यांचा विचार जनमानसात रुजला. नाट्य व्यवस्थापन कार्य महत्त्वाचे असल्याकारणाने मराठी नाट्य परिषदेने नाट्य व्यवस्थापनासाठीचा स्वतंत्र पुरस्कार देण्यास सुरुवात केली. त्याचाच परिपाक म्हणून २०१५ ला बेळगाव व सतीशरावांचा वारसा पुढे घेऊन जाणारे त्यांचे चिरंजीव मंदार अडगटला यांना २०१८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी नाट्य संमेलनामध्ये उत्कृष्ट नाट्य व्यवस्थापकाचा पुरस्कार देऊन गौरव केला गेला. हे कार्य करीत असताना सिने-नाट्य क्षेत्रातील प्रभाकर पणशीकर, निळू फुले, शरद तळवळकर, डॉ. श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, रोहिणी हट्टंगडी, सदाशिव अमरापूरकर, नाना पाटेकर, विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, मधू कांबीकर, फय्याज, वर्षा उसगावकर, यासारख्या दिग्गज कलाकारांशी त्यांचा जवळून संबंध आला. व्यवस्थापक म्हणून अडगटला यांनी या कलाकारांना कधीही तक्रार करण्याची संधी दिली नाही.

हल्ली घरोघरी पोहोचलेल्या मनोरंजनाच्या साधनांमुळे घरबसल्या लोकांचे मनोरंजन होऊ लागले. परिणामतः अहमदनगरच्या ग्रामीण भागातील नाट्यरसिक हळूहळू नाटकाकडे पाठ फिरवू लागला. त्यातच भर म्हणून नाटक कंपन्यांचे वाढते मानधन व त्या मानधनाच्या अनुषंगाने लावला जाणारा तिकीट दर सर्वसामान्य नाट्य रसिकांच्या खिशाला न परवडणारा होता. एक नाट्य व्यवस्थापक व नाटकाचा जाणकार असणाऱ्या सतीश अडगटला यांची कुचंबणा होऊ लागली. ग्रामीण भागात मराठी नाटकाची होणारी वाताहत त्यांच्या मनाला सतत बोचत होती. तरीही मराठी नाटक सर्वसामान्य ग्रामीण रसिकांपर्यंत गेले पाहिजे ही तीव्र इच्छा मनात घेऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नाट्य व्यवस्थापन करता करता चार्मिंग पेन सेंटरच्या माध्यमातून त्यांनी जाहिरात व्यवसाय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला.

सहकार संघटक

प्रा. मधुकर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर कॉलेजमध्ये शिकत असताना एक युवा नेतृत्व म्हणून सतीश अडगटला हे विद्यार्थिप्रिय होते. आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये कुशल संघटकाचे गुण घेऊन त्यांनी लोक जोडण्याचा प्रयत्न केला आणि पद्मशाली समाजामध्ये आपल्या संघटन कौशल्याची छाप सोडली. त्याचीच प्रचीती म्हणून मुकुंद घैसास प्रणीत पॅनलमधून १९८८ साली अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीला ते उभे राहिले आणि संचालक म्हणून निवडून आले. उमदा तरुण कार्यकर्ता, पद्मशाली समाजातील उच्चशिक्षित युवक व काम करण्याची तत्परता यामुळे त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांचा विश्वास संपादन केला. संचालक म्हणून बँकेच्या विकास योजना व ध्येयधोरणाचा अभ्यास करून अहमदनगर शहर सहकारी बँकेचा विकास करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. विश्वासाच्या बळावर सलग सात वेळा निवडून येऊन अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक पदाची धुरा सांभाळली.

सर्वसमावेशक व्यक्ती

नाटक, सहकार व सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी फक्त पद्मशाली समाजाचेच प्रतिनिधित्व केले नाही तर विविध जातीधर्मातील लोक जोडण्याचे काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. याचा परिपाक आज अहमदनगरमध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे असा ध्यास व अट्टहास ते धरत असत. तळागाळातील समाजाच्या मुलांनी विशेषतः मुलींनी शिकून मोठे झाले पाहिजे असे नेहमी त्यांना वाटत असे. याची सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून करून आपल्या बहिणी, मुले व सुनांना उच्च शिक्षित केले. सामाजिक परिवर्तनाची मोठी परंपरा लाभलेल्या अहमदनगरच्या मातीत वाढलेल्या सतीश अडगटला यांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. स्वतःच्या बहिणी, मुलगा व भाचीच्या आंतरजातीय विवाहास मान्यता दिली.

सतीश अडगटला यांच्या जाण्याने नाट्य, सहकार व सामाजिक क्षेत्राची न भरून निघणारी हानी झाली आहे. शेवटी अहमदनगरमधील नाट्य चळवळीचे पुनरुज्जीवन झाले तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

-डॉ. दत्तात्रय मोहिते

(लेखक नाट्य कला अभ्यासक आहेत)

--

फोटो- सतीश अडगटला

Web Title: Satish Adgatla: Manabindu in the field of drama management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.