अण्णांच्या समर्थनार्थ नगरमध्येआत्मक्लेश; गांधींच्या बंगल्याला राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ घालणार घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:25 IST2018-03-28T13:24:19+5:302018-03-28T13:25:00+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला दुपारी घेराव घालणार आहेत.

अण्णांच्या समर्थनार्थ नगरमध्येआत्मक्लेश; गांधींच्या बंगल्याला राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ घालणार घेराव
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला दुपारी घेराव घालणार आहेत.
अण्णांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. केंद्र सरकारला सत्याग्रहाची पूर्वकल्पना असूनही अण्णांच्या मागण्यांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. कुठलीही घोषणा नाही, निवेदन नाही हे या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य होते. कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री अण्णांचे आजोळ असलेल्या निंबळक गावात कॅण्डल मार्च काढला. यास गावातील अबाल वृद्ध, तरुण, लहान मुले यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच सावेडी उपनगरात चौकात सभा घेऊन जनजागृती केली.
दरम्यान आज राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच गावात एकही सरकारी यंत्रण येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी राळेगणसिद्धी येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही ग्रामस्थांनी गाव सोडण्याची सूचना केली आहे.