आर्चीसाठी सैराट गर्दी
By Admin | Updated: October 2, 2016 00:49 IST2016-10-02T00:38:08+5:302016-10-02T00:49:02+5:30
अहमदनगर : सैराटफेम रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी नगरकरांनी सैराट गर्दी केली होती...तिची एक झलक पाहण्यासाठी तब्बल तीन तास प्रेक्षक भर पावसात ताटकळत उभे होते.

आर्चीसाठी सैराट गर्दी
अहमदनगर : सैराटफेम रिंकू राजगुरू म्हणजेच ‘आर्ची’ला पाहण्यासाठी नगरकरांनी सैराट गर्दी केली होती...तिची एक झलक पाहण्यासाठी तब्बल तीन तास प्रेक्षक भर पावसात ताटकळत उभे होते... शिट्टया, आरडोओरड अन् आर्चीच्या नावाने पुकारा करत तरुणांनी आपल्या सैराटपणाचे दर्शन घडविल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली़ एकदाची आर्ची व्यासपीठावर आली तसा गर्दीचा लोट पुढे लोटला. गर्दीमुळे दहा मिनिटे व्यासपीठावर थांबून तिने नगरकरांचा निरोप घेतला.
नवरात्रौत्सवानिमित्त देवाज् ग्रुपने रिंकू राजगुरू हिला आमंत्रित केले होते. सैराटच्या प्रदर्शनानंतर ती प्रथमच नगर शहरात आली होती. तिला पाहण्यासाठी सायंकाळी सातपासूनच नगरकरांनी प्रोफेसर कॉलनी चौकात गर्दी केली होती. त्यात लहान मुलांसह, महिला व तरुणाई मोठ्या प्रमाणावर होती. तरुणांची गर्दी लक्षात घेता मोठी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षाकठडेही बांधले होते. मात्र, गर्दीने हे कठडेही तोडले. देवाजग्रुपच्या स्वयंसेवकांनी पोलिसांच्या मदतीने गर्दीचे नियंत्रण केले.
प्रोफेसर चौकातील इमारतींवरही प्रेक्षकांनी आर्चीची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती़ आर्ची सात वाजता येणार होती. परंतु रात्री ९ वाजता ती व्यासपीठावर आली. गर्दीमुळे तिला व्यासपीठावर आणतानाही संयोजकांची दमछाक झाली. व्यासपीठावर आल्यानंतर तिने प्रेक्षकांना हात उंचावून अभिवादन केले. यावेळी व्यासपीठावर गर्दी झाल्यामुळे स्टेजही खचले. मात्र, संयोजकांनी तातडीने ते सावरले. त्यानंतर आर्ची संवाद साधणार होती. मात्र, गर्दीच आटोक्यात येत नसल्याने तिने संवाद न साधताच निरोप घेतला. रिंकूच्या उपस्थितीत आमदार संग्राम जगताप, देवाज् ग्रुपचे संस्थापक नगरसेवक स्वप्निल शिंदे, कुमार वाकळे, कुस्तीपट्टू अंजली देवकर आदींनी देवीची आरती केली.
कार्यक्रम संपल्यानंतरही आर्चीची कार तब्बल २० मिनिटे या गर्दीत अडकून राहिली़ नगरकरांचा हा अलोट प्रतिसाद पाहत आर्चीही भारावून गेली होती. जाताना तीने सर्व प्रेक्षकांना धन्यवाद दिले. स्वप्निल शिंदे, कुमार वाकळे स्वत: गर्दी नियंत्रित करत होते. (प्रतिनिधी)
झिंगाट झालेच नाही
आर्ची व्यासपीठावर आल्यानंतर प्रेक्षकांनी सैराट चित्रपटातील झिंगाट गीत वाजविण्याची फर्माईश केली़ आर्चीचा संवाद होऊन ‘झिंगाट’ गाणे वाजविले जाणार होते. मात्र, प्रेक्षकांनी कठडे तोडून थेट व्यासपीठापर्यंत गर्दी केली. त्यामुळे कार्यक्रम वेळेपूर्वीच संपवावा लागला.