मृत्यूशी झुंजणाऱ्या जावयाच्या मदतीसाठी सरसावली सासुरवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:43+5:302021-03-07T04:18:43+5:30
बोधेगाव : सुरक्षारक्षक म्हणून सेवेत असणारे शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील एक जावई अपघातामुळे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...

मृत्यूशी झुंजणाऱ्या जावयाच्या मदतीसाठी सरसावली सासुरवाडी
बोधेगाव : सुरक्षारक्षक म्हणून सेवेत असणारे शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील एक जावई अपघातामुळे सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने त्यांच्या उपचारासाठी संकटात सापडलेल्या या जावयासाठी सासुरवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला आहे.
शिंगोरी (ता.शेवगाव) येथील धर्मराज नामदेव चेमटे यांच्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी महादेव दगडू फुंदे (रा. वाळुंज, ता. पाथर्डी ) यांच्याशी विवाह झाला. महादेव फुंदे हे मुंबई याठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा २२ फेब्रुवारी रोजी ड्युटीवरून घरी येत असताना कल्याण रेल्वेस्टेशन जवळ चालू रेल्वेतून पडून अपघात झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यात जवळपास ४ ते ५ लाखांचा खर्च झाला. घरची परिस्थिती बिकट असल्याने वडिलांनी शेतजमीन विकून पैसे भरले. मात्र महादेव फुंदे अजूनही कोमातच असून अधिकच्या उपचारासाठी अजून काही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने सोशल मीडियातून नातेवाईक, मित्र परिवाराकडून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
या आवाहनास प्रतिसाद देत शिंगोरी या सासुरवाडीतील युवकांनीही पुढाकार घेऊन मदत गोळा केली. येथील शृंगऋषी प्रतिष्ठान, भगवती तरुण मंडळ माऊली ग्रुप, बजरंग ग्रुप आदींच्या माध्यमातून तसेच परगावी नोकरी व व्यवसायानिमित्त असणाऱ्या युवकांनी साधारणतः ३० हजार रुपये जमा केले. तसेच शेवगाव-पाथर्डीसह राज्यभरातून अनेकांनी संबंधिताच्या खात्यावर जवळपास ५ लाखांची मदत जमा केली आहे.
---
मुलाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन परिस्थितीअभावी उपचारासाठी जवळ पैसे नसल्याने महादेव फुंदे यांच्या आई-वडिलांची एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःची उरलीसुरली जमीनही विकली आहे. मात्र अजूनही पैशांची गरज असल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
---
०६ बोधेगाव
शिंगोरी येथील युवकांनी जमा केलेली आर्थिक मदत महादेव फुंदे यांचे सासरे धर्मराज चेमटे यांच्याकडे सुपुर्द करताना ग्रामस्थ.