खरडगावात महसूलच्या पथकावर वाळूचोरांची दगडफेक
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:16+5:302020-12-05T04:37:16+5:30
शेवगाव : तालुक्यातील खरडगाव येथे मंगळवारी मध्यरात्री वाळू महसूल पथक, कामगार तलाठ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी तलाठी किसन ...

खरडगावात महसूलच्या पथकावर वाळूचोरांची दगडफेक
शेवगाव : तालुक्यातील खरडगाव येथे मंगळवारी मध्यरात्री वाळू महसूल पथक, कामगार तलाठ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी तलाठी किसन पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन पोटे यांनी खरडगाव येथील नांदणी नदीतून काही व्यक्ती ट्रॅक्टरने वाळू उपसा करीत असल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली. त्यांनी कारवाईसाठी मदत मागविली. मंळवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास मंडळाधिकारी अनिल बडे, ठाकूर निमगावचे तलाठी मेहेंद्र शिंदे, किसन पोटे व कोतवाल धुराजी म्हस्के असे पथक छापा टाकण्यास नदीपात्रात गेले होते. त्यावेळी नदीत प्रवीण भोसले, आकाश लबडे (दोघे रा. खरडगाव) यांचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून उभे होते. त्यांच्या समवेत दोन अनोळखी इसम होते. त्यांनी पथकाला पाहिल्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉली तेथेच सोडून पथकावर दगडफेक केली. यात तलाठी पोटे जखमी झाले. रात्रीची वेळ व अंधार असल्याने पथक मदतीसाठी गावच्या दिशेने गेले.
दरम्यान, वाळूचोर ट्रॉली सोडून निघून गेल्याने जेसीबी व दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने वाळूने भरलेल्या दोन्ही ट्रॉली तहसील कार्यालयात आणण्यात आल्या. यावर कुठलेही नंबर लिहिलेले नाहीत. याबाबत प्रवीण भोसले, आकाश लबडे, इतर दोन अनोळखी इसमांवर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.