वाळू तस्करांचा तामसवाडी शिवारात तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:22 IST2018-02-05T16:21:27+5:302018-02-05T16:22:23+5:30
नेवासा तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसूलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळू तस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू तस्करांचा तामसवाडी शिवारात तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
नेवासा : तालुक्यातील तामसवाडी शिवारात महसूलचे कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना वाळू तस्करांनी सरकारी वाहनाला धक्का मारून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील कामगार तलाठी दिलीप श्रीधर जायभाय व सहकारी शनिवारी रात्री तामसवाडी शिवारात गोडी नावाच्या नदीपात्रात गस्त घालत असताना वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरने सरकारी गाडीला रात्री धक्का मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तलाठी जायभाय यांना उजव्या पायावर रॉडने मारहाण करण्यात आली तर शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केला व वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पळवून नेल्याची तक्रार तलाठी जायभाय यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली आहे. याप्रकरणी गणेश अशोक भोगे, राजू गोपीनाथ मराठे, दीपक पालवे, लाटे, फाटके यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.