ऑनलाइन शिबिरात अमेरिकेतील मुलांनी घेतले संस्कारांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:39+5:302021-07-29T04:22:39+5:30
अहमदनगर : अमेरिकास्थित शार्लेट मराठी मंडळ यांच्यावतीने ऑनलाइन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘मिशन माणुसकी’ संचालित माणुसकीच्या शाळेच्या ...

ऑनलाइन शिबिरात अमेरिकेतील मुलांनी घेतले संस्कारांचे धडे
अहमदनगर : अमेरिकास्थित शार्लेट मराठी मंडळ यांच्यावतीने ऑनलाइन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘मिशन माणुसकी’ संचालित माणुसकीच्या शाळेच्या सौजन्याने हे शिबिर पार पडले. शिबिराचे प्रमुख शिवाजीराव नाईकवाडी यांनी मुलांना संस्कारांचे धडे देऊन परदेशातील मुलांना हस्तकला शिकविल्या.
गत आठवड्यात झालेल्या या ऑनलाइन शिबिराचे उद्घाटन मिशन माणुसकीचे प्रवर्तक लोकशाहीर संभाजी भगत यांचे हस्ते झाले. या शिबिरात परिवर्तन गीते, संस्कारक्षम व नैतिक मूल्ये, मानवी मूल्यांची जपवणूक, बौद्धिक खेळ, बोधपर गोष्टी, मान्यवरांचे मार्गदर्शन, चित्रफीत, रेकॅार्ड गीते, हस्तकला, भारतातील महापुरुषांचे चरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. शार्लेट मराठी मंडळाचे अध्यक्ष राहुल गरड यांनी सर्व शिबिरार्थी यांचे स्वागत केले.
या ऑनलाइन शिबिरात शिबिरार्थींना योगाभ्यासक अनघा राऊत, सुजाता सब्बन यांनी सूर्यनमस्कार व योगासने, म्युझिकल योगा, झुम्बा डान्स शिकविला. शाहीर संभाजी भगत यांनी माणसात माणूसपण पेरण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे हे सांगताना छोटी-छोटी उदाहरणे दिली. मिशन माणुसकीचे विश्वस्त अल्लाउद्दिन शेख, मिशन माणुसकीचे अध्यक्ष मारुती शेरकर, यशदा पुणेचे व्याख्याते संजय गवांदे, योगविद्याधाम संस्थेचे प्रवर्तक दत्ता दिकोंडा, प्राचार्य भावना शिंगवी यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी नैतिकतेचे संस्कारमूल्य शिबिरार्थींना दिले. शिबिराचे सूत्रसंचालन सुवर्णा भवर यांनी केले. सुप्रिया भोर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ऑनलाइन शिबिर पार पाडण्यासाठी शार्लेट मराठी मंडळाचे अध्यक्ष राहुल गरड, उपाध्यक्ष महेश भोर, अमित कोलुरवार, मिलिंद बनसोडे, सुवर्णा भोर, सुप्रिया भोर यांनी परिश्रम घेतले. २४ जुलैपासून सात दिवसांचे राज्यस्तरीय संस्कार शिबिर सुरू असल्याची माहिती शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी दिली.
-------
फोटो- २८ ऑनलाईन शिबिर
शार्लेट या अमेरिकास्थित मराठी मंडळातर्फे झालेल्या ऑनलाइन शिबिरात मार्गदर्शन करताना शिवाजीराव नाईकवाडी. समवेत ऑनलाइन सहभागी झालेली मुले.