राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवाराला एकच सूचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:45+5:302021-02-05T06:31:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सुरेश भोसले व भाजपचे उमेदवार जगन्नाथ राळेभात यांचे चिरंजीव अमोल ...

The same indicator to the NCP and BJP candidate | राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवाराला एकच सूचक

राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवाराला एकच सूचक

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सुरेश भोसले व भाजपचे उमेदवार जगन्नाथ राळेभात यांचे चिरंजीव अमोल या दोघांनाही शिवाजी भोसले हे सूचक आहेत. दोन्ही उमेदवारांना एकच व्यक्ती सूचक असल्याने कायदशीर पेच निर्माण झाला आहे. जामखेडमधील या दोघांच्या अर्जाबाबत काय निर्णय होतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली. यावेळी विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सुरेश भोसले यांनी भाजपचे अमोल जगन्नाथ राळेभात यांच्या, तर अमोल राळेभात यांनी सुरेश भोसले यांच्या अर्जावर हरकत नोंदविली. या दोघांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून शिवाजी प्रकाश भोसले यांची स्वाक्षरी आहे. यापैकी अमोल राळेभात हे जगन्नाथ राळेभात यांचे चिरंजीव आहेत. जगन्नाथ राळेभात यांनी स्वत:ही अर्ज दाखल केलेला आहे. राळेभात पिता-पुत्रांनी विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केले असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून सुरेश भाेसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु भोसले यांच्या अर्जावर अमोल राळेभात यांनी हरकत घेतली असून, त्यावर सुनावणीही घेण्यात आली; परंतु निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर याबाबत गुरुवारी (दि. २८) निकाल जाहीर करणार आहेत. वैध उमेदवारांची यादीही उपनिबंधक कार्यालयाकडून प्रसिद्ध केली जाईल. या यादीत भोसले व अमोल राळेभात यांची नावे असतील की दोघांचेही अर्ज बाद होतात, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून राहाता तालुक्यातील अण्णासाहेब म्हस्के व माजी आमदार चंद्रशेखर घुले या दोघांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून श्रीगोंदा, जामखेड आणि कोपरगाव तालुक्यातही बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, वैभव पाचपुते आणि प्रवीण कुरुमकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. कोपरगाव तालुक्यातून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे, देवेंद्र रोहमारे, किसन पाडेकर आणि अलकादेवी जाधव यांचे अर्ज दाखल आहेत.

...

राळेभात पिता-पुत्रांची खेळी

जामखेड तालुक्यातील विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात, अमोल जगन्नाथ राळेभात आणि सुरेश महादेव भोसले, असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी अमोल राळेभात व सुरेश भोसले या दोघांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्या. यामध्ये दोघांचे सूचक एकच असणे, हा प्रमुख मुद्दा आहे.

Web Title: The same indicator to the NCP and BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.