समाधीमंदिरात जाऊन वानराने घेतले साईदर्शन
By Admin | Updated: August 26, 2014 01:53 IST2014-08-26T00:55:13+5:302014-08-26T01:53:30+5:30
शिर्डी : सोमवारी शिर्डीत एका महाकाय वानराने साईमंदिरात येऊन चक्क साईदर्शन घेतले़ एवढेच नव्हे तर अभिषेक पूजेतील साईमूर्ती गालाचे चुंबन घेतले.

समाधीमंदिरात जाऊन वानराने घेतले साईदर्शन
शिर्डी : सोमवारी शिर्डीत एका महाकाय वानराने साईमंदिरात येऊन चक्क साईदर्शन घेतले़ एवढेच नव्हे तर अभिषेक पूजेतील साईमूर्ती गालाचे चुंबन घेतले. त्याच्या या अनोख्या भक्तीची भाविकांत चांगलीच चर्चा होती.
सोमवारी दुपारी माध्यान्ह आरतीपूर्वी मंदिरात साफसफाई सुरू असताना ज्या मार्गाने भाविक बाहेर पडतात त्या गुरूस्थान द्वारातून या वानराने समाधी मंदिरात प्रवेश केला़ यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. कुणाला काहीही दुखापत न करता हे वानर काहीवेळ पादुकांच्या जवळ बसले़ त्यानंतर ते व्हीआयपी कक्षात आले़ तेथे पुजाऱ्याने दिलेल्या पेढ्याचा प्रसाद घेऊन त्याने आल्या मार्गानेच बाहेर धूम ठोकली़यावेळी मंदिरात उपकार्यकारी आप्पासाहेब शिंदे, मंदिरप्रमुख रामराव शेळके उपस्थित होते़ संस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वानराचे हे साईदर्शन कैद झाले़
त्यानंतर हे वानर सत्यनारायण हॉलच्या वर असलेल्या अभिषेक कक्षात गेले़ तेथे असलेल्या पंचधातू साईमूर्तीच्या गालाचे त्याने चुंबन घेतले़ पाच फूट उंचीची ही मूर्ती चेन्नईचे साईभक्त रमणी यांनी दिलेली आहे़ या वानराची साईभक्ती बघून कर्मचाऱ्यांची भीती नाहिशी झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरून हातही फिरवला़यानंतर हे वानर दत्त मंदिराच्या परिसरात थेट भाविकात जाऊन बसले़ (तालुका प्रतिनिधी)